बातम्या
केडीसीसी बँकेचे शेतकऱ्यांसाठी कृषी ड्रोन खरेदी कर्ज धोरण मंजूर; अनुदानासह रोजगाराच्या नव्या संधी
By nisha patil - 1/9/2025 4:15:40 PM
Share This News:
केडीसीसी बँकेचे शेतकऱ्यांसाठी कृषी ड्रोन खरेदी कर्ज धोरण मंजूर; अनुदानासह रोजगाराच्या नव्या संधी
कोल्हापूर, दि. १ : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (केडीसीसी) शेतकऱ्यांसाठी कृषी ड्रोन खरेदीचे कर्ज धोरण मंजूर केले आहे. अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेतीतील तंत्रज्ञान वापराला चालना, उत्पादन वाढ व रोजगार निर्मिती हा या धोरणामागचा उद्देश आहे.
कृषी ड्रोनद्वारे पिक निरीक्षण, फवारणी, परागीकरण, रोग नियंत्रण, बियाणे लागवड, माती विश्लेषण आदी कामे करता येणार असून यामुळे शेतकऱ्यांना वेळ व श्रम बचत होऊन उत्पादनवाढ होईल. केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत हे कर्ज दिले जाणार आहे.
अनुदानाची रचना अशी आहे :
-
ग्रामीण युवकांना ४०% (रु. ४ लाखांपर्यंत)
-
कृषी पदवीधरांना ५०% (रु. ५ लाखांपर्यंत)
-
शेतकरी उत्पादक संस्थांना ७५% (रु. ७.५ लाखांपर्यंत)
-
शासकीय संस्थांना १००% (रु. १० लाखांपर्यंत) अनुदान
या योजनेमुळे ग्रामीण बेरोजगारांना व्यवसायाच्या संधी मिळणार असून, पिक विमा दावा, माती सर्वेक्षण आणि संसाधनांचा योग्य वापरासाठी ड्रोन महत्त्वाचे ठरणार आहेत.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, “बँकिंग क्षेत्रासोबत शेतीतील तंत्रज्ञान स्वीकारण्यात केडीसीसी बँक आघाडीवर आहे. जिल्ह्यातील सर्व विकास सेवा संस्थांचे संगणकीकरण लवकरच पूर्ण होईल.”
बैठकीला उपाध्यक्ष राजूबाबा आवळे, आमदार डॉ. विनयराव कोरे, आमदार अमल महाडिक, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, माजी खासदार निवेदिता माने यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
केडीसीसी बँकेचे शेतकऱ्यांसाठी कृषी ड्रोन खरेदी कर्ज धोरण मंजूर; अनुदानासह रोजगाराच्या नव्या संधी
|