बातम्या

केडीसीसी बँकेकडून शेतकऱ्यांना कृषी ड्रोनचे वितरण

KDCC Bank distributes agricultural drones to farmers


By nisha patil - 11/17/2025 6:08:59 PM
Share This News:



केडीसीसी बँकेकडून शेतकऱ्यांना कृषी ड्रोनचे वितरण
 

तंत्रज्ञानयुक्त शेतीला नवे बळ – भरघोस अनुदानासह रोजगाराच्या नवीन संधी 

कोल्हापूर, दि. १७ :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी ड्रोनचे वितरण करून तंत्रज्ञानाधारित शेतीकडे मोठे पाऊल उचलले आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत महिन्यापूर्वी या उपक्रमास मंजुरी देण्यात आली होती.

केंद्र व राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानाअंतर्गत विकास सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज व ड्रोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वाढता वापर, मजूर टंचाई, वाढते खत-औषध खर्च या पार्श्वभूमीवर ड्रोन तंत्रज्ञान शेतीला नवे दिशा देणार आहे.


कृषी ड्रोनचा बहुपयोग

कृषी क्षेत्रातील सर्वात उपयुक्त साधन म्हणून ड्रोनचा वापर खालील कामांसाठी होणार आहे —
• पिकांचे निरीक्षण
• कीटकनाशक/बुरशीनाशकांची फवारणी
• पाणी व्यवस्थापन
• परागीकरण
• बियाणे पेरणी
• माती व पिकवाढ विश्लेषण
• जमिनीचे ड्रोन सर्वेक्षण
• पिक विमा दाव्यासाठी अचूक माहिती

यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात, कमी श्रमात आणि जास्त उत्पादन मिळण्याची संधी वाढणार आहे.


अनुदानाची तरतूद — फायदेशीर योजना

बाजारात उपलब्ध कृषी ड्रोनची किंमत साधारण १० ते १२ लाख रुपये आहे. यामध्ये अनुदान पुढीलप्रमाणे —

ग्रामीण युवक (दहावी पास + प्रशिक्षण) : ४०% अनुदान (४ लाखपर्यंत)
कृषी पदवीधारक : ५०% अनुदान (५ लाखपर्यंत)
शेतकरी उत्पादक संस्था (FPO) : ७५% अनुदान (७.५ लाखपर्यंत)
शासकीय संस्था : १००% अनुदान (१० लाखपर्यंत)

कर्जफेडीची मुदत ५ वर्षे, १० समान हप्त्यांमध्ये परतफेड.


योजनेची उद्दिष्टे

• अवघड भूभागात सोयीस्कर व सुरक्षित फवारणी
• वेळ व पैशाची मोठी बचत
• सुशिक्षित ग्रामीण युवकांना नवीन रोजगार
• पाणी, खते, कीटकनाशके यांचा नियंत्रित वापर
• जमिनीचे अचूक सर्वेक्षण
• पिक विम्यासाठी तांत्रिक आकडेवारी
• रोग, तण व हवामानावर आधारीत अचूक उपाय


या कार्यक्रमाला बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे, आयटी विभाग प्रमुख गिरीश पाटील, शेती कर्ज विभाग व्यवस्थापक राजू पाटील, तसेच अमूल्या अग्रोबोट व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

➡️ तंत्रज्ञानाधारित आधुनिक शेतीकडे कोल्हापूर जिल्हा वेगाने वाटचाल करत असून, ड्रोन योजनेमुळे शेतकऱ्यांना नवे बळ मिळणार आहे.


केडीसीसी बँकेकडून शेतकऱ्यांना कृषी ड्रोनचे वितरण
Total Views: 34