राजकीय
केडीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्यांना बोनसपोटी सव्वा आठ कोटी अदा
By nisha patil - 1/10/2025 11:37:17 AM
Share This News:
कोल्हापूर दि. ३०: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसपोटी तब्बल सव्वा आठ कोटी रुपये अदा केले आहेत. तसेच; जिल्ह्यातील विकास सेवा संस्थांच्या गट सचिवानाही बक्षीस पगारापोटी सव्वा दोन कोटी रुपये अदा केले आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे बँक कर्मचाऱ्यांसह गटसचिवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. बँकेने ही सर्व रक्कम बँक कर्मचारी व गट सचिवांच्या सेविंग खात्यांवर वर्ग केलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, केडीसीसी बँक कर्मचाऱ्यांच्या गेल्या वर्षभराच्या एकूण मूळ पगार व महागाई भत्त्याच्या नऊ टक्केच्या प्रमाणात होणारी ही एकूण रक्कम रू. ८, २७, ४७, १२० एवढी आहे. एकूण दीड हजारावर कर्मचाऱ्यांमध्ये बँकेकडे कायम कर्मचाऱ्यांची संख्या १,१९८ आहे, अनुकंपा तत्त्वावरील कर्मचारी संख्या २१ व कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या २७२ आहे. अशा एकूण १, ४९१ कर्मचाऱ्यांना बँकेने नऊ टक्केप्रमाणे प्रमाणे हा दिवाळीत बोनस अदा केला.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभासद या नात्याने गावांगावांमध्ये कार्यरत असलेल्या विकास सेवा संस्था संलग्न आहेत. त्या संस्थांच्या माध्यमातून कर्ज वाटप, वसुली, व्याज परतावा योजना राबविण्यासाठी जिल्ह्यातील गट सचिव नेहमीच अग्रेसर असतात. तसेच; केंद्र शासनाने राबविलेल्या संस्थाच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील १,७५१ विकास संस्थांमध्ये कामकाज गतीने सुरू आहे. यामध्येही गट सचिवांचे योगदान मोठे आहे.
केडीसीसी बँकेने जिल्ह्यातील गट सचिवानाही दिवाळी सणासाठी बक्षीस पगारापोटी सव्वा दोन कोटी रुपये अदा केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गावांगावांमध्ये एकूण १,९३१ विकास सेवा संस्था कार्यरत आहेत. या सर्व विकास सेवा संस्थांमधून काम करणाऱ्या गटसचिवांची संख्या ९२७ इतकी आहे. त्यांना अदा केलेल्या बक्षिस पगाराची ही रक्कम रू. २, १४, ९८, ७१७ आहे. मार्च -२०२५ या महिन्यातील पगाराएवढी रक्कम बँकेने गट सचिवांना दिवाळी बक्षीसापोटी दिली आहे. मार्च -२०२५ च्या ताळेबंदातच बँकेने गट सचिवांच्या बक्षीस पगारापोटी दोन कोटींची तरतूद करून ठेवली होती.
केडीसीसी बँकेच्या कर्मचाऱ्यांना बोनसपोटी सव्वा आठ कोटी अदा
|