विशेष बातम्या
के.एम.टी. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; ७ वा वेतन आयोग लागू — आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश
By nisha patil - 10/17/2025 6:15:40 PM
Share This News:
के.एम.टी. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; ७ वा वेतन आयोग लागू — आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश
कोल्हापूर दि. १७ : कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम (KMT) कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या प्रश्नाचा शेवटी निकाल लागला असून, शासनाने या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यास मान्यता दिली आहे.
नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित प्रस्तावावर सही करून तात्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. महापालिका प्रशासनाने सप्टेंबर महिन्याच्या वेतनात सातवा वेतन आयोग लागू करून देताच कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
सन २०१९ पासून महापालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला होता, मात्र के.एम.टी. कर्मचारी त्यापासून वंचित होते. या प्रश्नावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
याबाबत के.एम.टी. कर्मचारी संघटनेच्या वतीने आमदार क्षीरसागर यांचे विशेष आभार मानण्यात आले. या वेळी मुन्सिपल ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष सचिन जाधव, गटनेते एम. डी. कांबळे, तसेच संघटनेचे पदाधिकारी उत्तम कांबळे, संजय भास्कर, जावेद सनदी, ज्ञानदेव शिंदे, विश्वास सोने, विजय सुतार आणि दत्ता बामणेकर उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार क्षीरसागर यांनी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सदैव पाठिशी राहण्याचे आश्वासन दिले तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबतचा आदेश लवकरच येईल, अशी ग्वाही दिली.
के.एम.टी. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; ७ वा वेतन आयोग लागू — आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश
|