बातम्या

कागल : साके-बाचणी रस्त्यावर दुचाकी अडवून बेदम मारहाण; कोयत्याने हल्ला, जखमी तरुणाचा मृत्यू

Kagal Two wheeler intercepted on SakeBachani road


By nisha patil - 7/11/2026 11:00:59 PM
Share This News:



कागल : साके-बाचणी रस्त्यावर दुचाकी अडवून बेदम मारहाण; कोयत्याने हल्ला, जखमी तरुणाचा मृत्यू

कागल प्रतिनिधी : अजित बोडके कागल : मावस बहिणीचा पाठलाग करीत असल्याच्या संशयावरून दोघांनी दुचाकी अडवून केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निलेश नामदेव पाटील (वय २८, रा. साके, ता. कागल) असे मृत तरुणाचे नाव आहे. साके-बाचणी रस्त्यावर २ नोव्हेंबर रोजी रात्री ही घटना घडली होती.

याप्रकरणी विजय अरविंद पवार (वय २२, रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी) आणि प्रथमेश उर्फ गुंड्या आनंदा पाटील (वय २४, रा. साके, ता. कागल) यांच्याविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रवीण नरेश पाटील (वय २३, रा. साके) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास निलेश पाटील हा साके-बाचणी रस्त्यावरून दुचाकीने जात होता. तो मळ्यातील नवीन घराजवळ आला असता त्याची दुचाकी अडवण्यात आली. "आमच्या मावस बहिणीचा पाठलाग का करतो?" असा जाब विचारत आरोपींनी निलेशशी वाद घातला. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. यावेळी संतापातून जीवे मारण्याची धमकी देत कोयत्यासारख्या धारदार हत्याराने निलेशच्या डोक्यावर वार करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता.

त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. जखमी तरुणाचा मृत्यू झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून कागल पोलीस तपास करीत आहेत.

दोघांना अटक, कागल पोलिसांची कारवाई

या घटनेनंतर कागल पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास कागल पोलीस करीत आहेत.


कागल : साके-बाचणी रस्त्यावर दुचाकी अडवून बेदम मारहाण; कोयत्याने हल्ला, जखमी तरुणाचा मृत्यू
Total Views: 13