बातम्या
कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघात पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविणार मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
By nisha patil - 2/4/2026 7:09:40 PM
Share This News:
कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघात पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविणार
मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
रविवार दि. १९ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणार प्रारंभ
कागल तहसील कार्यालयात आढावा बैठक संपन्न
कागल, दि. २: शेत-शिवारातील पाणंद रस्ते हे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील जीवनमार्ग असून त्यांच्या सुलभ हालचालीसाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबविणार, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल, गडहिंग्लज, उत्तुर विधानसभा मतदारसंघातील या अभियानाचा प्रारंभ रविवारी दि. १९ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कागल येथील तहसील कार्यालयात मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके, आजऱ्याचे तहसीलदार समीर माने, कागलचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांच्यासह विधानसभा मतदारसंघातील विविध विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
या बैठकीत बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे, वैरण व दूध वाहतूक, तसेच बी-बियाणे, खतांची ने-आण आणि काढणी केलेली पिके घरी आणण्यासाठी मजबूत पानंद रस्त्यांची सक्षम पायाभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण ही काळाची गरज असून या योजनेमुळे ग्रामीण भागातील वाहतूक सुलभ होणार आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी मी दरवर्षी माझ्या आमदार फंडातून नियमित निधी देईन. तसेच; सी. एस. आर. सह इतर विविध १४ योजनांमधून या योजनेवर खर्च करता येणार आहे.
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघात या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये वाद नसून परस्पर संमती आहे, त्या सर्व पाणंद रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात यावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तहसीलदार अमरदीप वाकडे म्हणाले, या योजनेअंतर्गत १०० टक्के यांत्रिकीकरणातून कामे करण्यात येणार असून महसूल विभागामार्फत स्वतंत्रपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. विविध शासकीय योजनांच्या एकत्रित निधीतून कामांना गती दिली जाणार आहे.
तसेच, आवश्यकतेनुसार भुमिअभिलेख विभागामार्फत विनामूल्य मोजणी केली जाणार असून पूर्ण झालेल्या रस्त्यांची नोंद ग्रामपंचायतीच्या नोंदवहीत करण्यात येणार आहे.
*मीही शेती केली आहे.....!*
श्री. मुश्रीफ म्हणाले, वडिलांचे निधन झाल्यानंतर शेतीची जबाबदारी माझ्यावर पडली होती. पानंदी आणि शेत रस्त्यांमध्ये शेतकऱ्यांचे होणारे हाल विशेषता: पावसाळ्यातील दुर्दशा मी स्वतः अनुभवलेली आहे. एक पाय चिखलातून काढून दुसरा पाय चिखलातच घालायचा, एवढे अपार कष्ट पडतात. शेतातून वैरण आणताना, ऊस वाहतूक करताना, शेतातील घरांमधून दूध ने-आण करताना आणि अशातच गवतातून जाणाऱ्या सापांची भीती. हे सगळं मी स्वतः अनुभवलेले आहे...
कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघात पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबविणार मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
|