बातम्या

कागल मेडिकल हब म्हणून नावारूपाला येत आहे

Kagal medical hub


By nisha patil - 11/4/2026 10:35:18 AM
Share This News:



*कागल मेडिकल हब म्हणून नावारूपाला येत आहे*    

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन*   

शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाचा लोकार्पण सोहळा उत्साहात*

कागल, : कागल शहर हे संपूर्ण महाराष्ट्राचे मेडिकल हब म्हणून नावारूपाला येत आहे. या शहरालगतच १०० बेड्सचे ग्रामीण रुग्णालय प्रशिक्षण पथक, मौजे सांगाव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय यामुळे वैद्यकीयदृष्ट्या कागलचे महत्त्व वाढतच आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

           

शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयाच्या कागलमधील बाह्यरुग्ण विभागाच्या लोकार्पण सोहळ्यात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जागतिक आरोग्य दिनाच्या औचित्यावर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  

           

श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, या बाह्य रुग्ण विभागात मेडिसिन विभाग, सर्जरी विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, इमर्जन्सी सेवा विभाग कार्यरत राहणार आहेत. लवकरच सर्व रक्त तपासण्यांसाठी पॅथॉलॉजी, एक्स-रे यंत्रसामुग्री, फिजिओथेरपी आणि योगा या सुविधाही उपलब्ध होणार आहेत. येथे उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांवर ईश्वरसेवा मानून उपचार करा. 

                

श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, लोककल्याणाच्या ध्यासाने झपाटलेला एखादा मंत्री काय करू शकतो, हे मी माझ्या कामातून दाखवून दिलेले आहे. उत्तूरमध्ये निसर्गरम्य परिसरात देशातील पहिले शासकीय निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय साकारत आहे. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजे सी. पी. आर. हा दवाखाना गोरगरिबांचा आधारस्तंभ आहे. या दवाखान्यात २०० कोटीहून अधिक निधीतून कायापालट केलेला आहे. बहुतांशी इमारतीच्या नूतनीकरणासह अत्यावश्यक व अत्याधुनिक सेवा, यंत्रसामुग्री व सेवासुविधा उपलब्ध केल्या आहेत. लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा होईल.      

         

*अमेरिकेतील शहरासारखे शेंडा पार्क.......!* 

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी साकारत आहे. येत्या दोन वर्षात ही सर्व कामे पूर्ण होतील. अमेरिकेतील एखाद्या शहराप्रमाणे ही वैद्यकीय नगरी साकारलेली आहे. कोल्हापूरला जाल त्यावेळी अवश्य भेट देऊन या.......!

 जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पालाई खोत, कागल नगराध्यक्षा सौ. सविता माने, कागल पंचायत समिती सभापती सौ. सुवर्णा पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, कागल पंचायत समिती उपसभापती डाॅ. इंद्रजीत पाटील, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर, महावि‌द्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. भाग्यश्री खोत, श्रीनाथ उद्योग समूहाचे संस्थापक चंद्रकात गवळी, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, शशिकांत नाईक, शहराध्यक्ष संजय चितारी, नगरसेवक प्रवीण काळबर, अर्जुन नाईक, सतिश घाडगे, नवल बोते, अमित पिष्टे, नवाज मुश्रीफ, सम्राट सणगर नगरसेविका सुवर्णा पिष्टे, रंजना सनगर, सुमन गवळी, के. पी. पिष्टे, सागर गुरव, सुनिल चौगले आदी प्रमुख उपस्थित होते.

  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पाताई खोत, पंचायत समितीच्या सभापती सौ. सुवर्णा पाटील, नगराध्यक्ष सौ. सविता प्रताप उर्फ भैय्या माने, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांचीही भाषणे झाली.

स्वागत डॉ. रोझारीओ डिसोजा यांनी केले. प्रास्ताविक अधिष्ठाता डाॅ. अभिजीत अहिरे यांनी केले. आभार स्वप्नाली बावरे यांनी मानले.

कागल- शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाचा लोकार्पण सोहळा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिल्पाताई खोत, पंचायत समितीच्या सभापती सौ. सुवर्णा पाटील, नगराध्यक्ष सौ. सविता प्रताप उर्फ भैया माने, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने व अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे व प्रमुख मान्यवर.


कागल मेडिकल हब म्हणून नावारूपाला येत आहे
Total Views: 17