बातम्या

कळंबा दुर्घटना : निष्काळजीपणामुळे तिघांचा मृत्यू, प्लंबरला अटक

Kalamba accident


By Administrator - 9/13/2025 11:36:23 AM
Share This News:



कळंब्यातील मनोरमा कॉलनीत झालेल्या गॅस पाईपलाईन स्फोटात भोजणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याप्रकरणी कंपनीचा परप्रांतीय प्लंबर महंमदहुजर रेहबीबुरहमान हुजेरअली (वय २८, रा. लकी बाजारजवळ, राजारामपुरी, मूळ रा. माहेल्लासराय, गुन्नौर, जि. संभल, उत्तर प्रदेश) याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

या प्रकरणातील अन्य संशयित गौरव भट, अभियंता हरिष नाईक आणि अमोल टी. जाधव यांचा पोलिसांकडून शोध सुरू असून, त्यांनाही लवकरच अटक होईल, अशी माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.

अटक केलेला प्लंबर सतीमाता कन्स्ट्रक्शन कंपनीत कार्यरत असून, त्यानेच अमर भोजणे यांच्या घरात गॅस पाईपलाईन जोडणीचे काम केले होते. नियमांप्रमाणे गॅस मीटर जोडले जाण्यापूर्वी पाईपलाईनला एंड कॅप लावणे बंधनकारक असते. मात्र प्लंबरने हे कॅप न लावल्याने गॅस गळती होऊन मोठा स्फोट झाला, असे दे सरकारच्या वतीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

२५ ऑगस्टला झाली भीषण दुर्घटना

मनोरमा कॉलनीत २५ ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या या स्फोटात शीतल अमर भोजणे, अनंत देवाजी भोजणे (वय ६०) आणि प्रज्वल अमर भोजणे (६ वर्षे) भाजून गंभीर जखमी झाले होते. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तिघांचा मृत्यू झाला. तर, ईशिका भोजणे (३ वर्षे) ही चिमुरडी अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहे.


कळंबा दुर्घटना : निष्काळजीपणामुळे तिघांचा मृत्यू, प्लंबरला अटक
Total Views: 93