बातम्या

कळंबा गॅस स्फोटाने आणखी एक बळी; प्रज्वलच्या मृत्यूने भोजणे कुटुंब उद्ध्वस्त

Kalamba gas pipeline accident


By nisha patil - 11/9/2025 10:43:31 AM
Share This News:



कळंबा हादरले! गॅस स्फोटातील तिसरा बळी, समाजाला प्रश्न : सुरक्षेची जबाबदारी कोणाची?
 

कोल्हापूर: कळंबा (ता. करवीर) येथील मनोरमा कॉलनीतील गॅस पाईपलाईन स्फोटाने अजून एक निर्दोष जीव हिरावला. गंभीर जखमी प्रज्वल अमर भोजणे (वय ५ वर्षे ६ महिने) याचा बुधवारी (दि. १० सप्टेंबर) मृत्यू झाला. तब्बल सोळा दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर हा चिमुकला हारला. प्रज्वलच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

२५ ऑगस्टला झालेल्या या भीषण स्फोटानंतर प्रज्वलची आई शीतल भोजणे (२९) यांचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी आजोबा अनंत भोजणे (६०) यांनीही प्राण गमावले. आता प्रज्वलचाही मृत्यू झाल्याने या घटनेतील तिसरा बळी गेला आहे. केवळ तीन वर्षांची ईशिका हीच या दुर्घटनेतून सध्या उपचार घेत असून, तिच्या भोवतीचे सर्व जिव्हाळ्याचे चेहरे एका क्षणात हिरावले गेले आहेत.

एका कुटुंबाचा श्वास संपला

गॅस पाईपलाईन स्फोटाने भोजणे कुटुंबाचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. आई, मुलगा आणि आजोबांचा मृत्यू झाल्याने आता ईशिका एकटीच उरली आहे. तिच्या हसऱ्या चेहऱ्यात अजूनही कुटुंबाच्या आठवणी दडल्या असल्या तरी तिच्या आयुष्याला आता समाजाचा आधार आणि उभारीच मोठा दिलासा ठरणार आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेने प्रशासनालाही हादरवले असून गॅस पाईपलाईन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निष्काळजीपणा, तांत्रिक त्रुटी किंवा मानवी चूक कोणतेही कारण असो; पण त्याची किंमत एका संपूर्ण कुटुंबाला प्राणाने चुकवावी लागली.

जुना राजवाडा पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेविषयी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


कळंबा गॅस पाईपलाईन दुर्घटना : ५ वर्षीय प्रज्वलचा मृत्यू, बळींची संख्या तीनवर
Total Views: 97