बातम्या
सततधार पावसाचा फटका; कणकवलीतील जुने भाजी मार्केटचा भाग कोसळला
By nisha patil - 6/30/2026 11:52:59 PM
Share This News:
सततधार पावसाचा फटका; कणकवलीतील जुने भाजी मार्केटचा भाग कोसळला
सिंधुदुर्ग ✒️गवस शुभम : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका कणकवली शहरालाही बसला असून, मंगळवारी सायंकाळी जुने भाजी मार्केट इमारतीचा काही भाग अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मोठा आवाज झाल्याने परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जुने भाजी मार्केटची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून तिचे आयुष्य संपल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष पारकर यांनी पुढे सांगितले की, केवळ डागडुजी करून हा प्रश्न सुटणार नसून इमारत तातडीने निर्लेखित करण्याची आवश्यकता आहे. व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. तसेच या ठिकाणी भविष्यात आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन व्यापारी संकुल उभारण्याचा मानस असून त्यासाठी आवश्यक प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
या घटनेमुळे जुने भाजी मार्केट परिसरातील जीर्ण इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सततधार पावसाचा फटका; कणकवलीतील जुने भाजी मार्केटचा भाग कोसळला
|