बातम्या

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत न राहता चालू कर्जाची मुदतीत परतफेड करा : हसन मुश्रीफ

Karjmafi hasan mushrif


By nisha patil - 5/13/2026 10:07:23 PM
Share This News:



कर्जमाफीच्या प्रतीक्षेत न राहता चालू कर्जाची मुदतीत परतफेड करा : हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. १३ : शासनाच्या निर्णयानुसार चालू वर्षातील पीक कर्जे कर्जमाफी योजनेस पात्र नसल्याने शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वसूलपात्र रक्कम मुदतीत भरावी, असे आवाहन केडीसीसी बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६” अंतर्गत ३० जून २०२५ अखेर थकीत असलेली तसेच ३० सप्टेंबर २०२५ अखेर दोन लाख रुपयांपर्यंतची पीक कर्ज थकबाकी पात्र ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, १ जुलै २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीतील ऊस हंगाम कर्जाची परतफेड मुदत ३० जून २०२६ पर्यंत असल्याने हे कर्ज कर्जमाफीस पात्र नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे चालू वर्षाचे कर्ज वेळेत न भरल्यास शेतकरी कर्जमाफी व प्रोत्साहन योजनेपासून वंचित राहू शकतात, असेही मुश्रीफ यांनी नमूद केले.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची राज्यातील उच्चांकी कर्जवसुलीची परंपरा कायम राखण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.


कर्जमाफीच्या प्रतीक्षेत न राहता चालू कर्जाची मुदतीत परतफेड करा : हसन मुश्रीफ
Total Views: 11