बातम्या

संभाव्य पूर परिस्थीतीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवा - प्रशासक के.मंजूलक्ष्मी

Keep all municipal systems ready to deal with possible flood situations


By nisha patil - 6/5/2025 9:08:06 PM
Share This News:



संभाव्य पूर परिस्थीतीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवा - प्रशासक के.मंजूलक्ष्मी

मान्सूनपुर्व कामाच्या तयारीचा प्रशासकांनी घेतला आढावा 

कोल्हापूर ता.6 : संभाव्य पूर परिस्थीतीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी संबंधीत सर्व अधिका-यांना दिल्या. मान्सून 2025 आणि संभाव्य पूरस्थितीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या पुर्वतयारीचा आढावा आज त्यांनी घेतला. आयुक्त कार्यालयात संबंधीत सर्व अधिका-यांची दुपारी हि बैठक घेण्यात आली. 
 

   प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी विभागीय कार्यालय अंतर्गत नाल्यांची व चॅनेलची सफाई पुर्ण झाली का याची खात्री करण्याच्या सूचना प्रभाग क्षेत्रीय अधिकारी तथा उप-आयुक्त, सहा.आयुक्त व उपशहर अभियंता यांना दिल्या. ओढयामधील किती गाळ उठाव झाला. सदरचा गाळ कोठे टाकला जातो याची व्हिजीटद्वारे तपासणी करावी. धोकादायक इमारतींना नोटीसा काढणे, त्यांवर काय कारवाई करणार, स्टक्चरल ऑडिट किती इमारतींचे केले, किती दुरुस्त केल्या याची माहिती पुढील बैठकीपुर्वी देण्याच्या सुचना उपशहर अभियंता यांना दिल्या.

पूर बाधीत क्षेत्रातील नागरीकांच्या स्थलांतरीत ठिकाणांची पाहणी करुन आवश्यक त्या सुविधा आताच करुन घेण्याच्या सूचना दिल्या. शहरातील धोकादायक झाडे, पोल पावसाळयापुर्वी उतरवून घेण्याची दक्षता उद्यान व विद्युत विभागाने घ्यावी. पूर बाधीत क्षेत्रातील वाहने पार्किंग करणेसाठी व जनावरे ठेवण्यासाठी विभागीय कार्यालयांनी आपल्या क्षेत्रातील ओपन स्पेसवर मागील वर्षी प्रमाणे नियोजन करावे. ज्या ज्या ठिकाणी पुराचे पाणी येते अशा भागांची यादी तयार करुन नागरीकांना स्थलांतरीत करण्याचे नियोजन करा. महापालिकेबरोबरच आवश्यकता भासल्यास खाजगी बोटी चालक यांचे फोन नंबरसह यादी तयार करण्याच्या सुचना मुख्य अग्निशमन अधिकारी यांना दिल्या. पूर बाधीत क्षेत्रामधील नागरीकांना पब्लिक अनाऊसमेंट सिस्टीमद्वारे सुचना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय ठेवण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना दिल्या. संभाव्य पूर परिस्थीतीमध्ये औषधांची, टँकरची व इतर अनुषंगीक जे साहित्य लागते ते घेण्यासाठी आताच निविदा प्रक्रिया पावसाळयापुर्वी पुर्ण करण्याच्या सूचना संबंधीत अधिका-यांना दिल्या.
  

 यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उपायुक्त पंडीत पाटील, कपिल जगताप, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, संजय सरनाईक, नगररचना सहा.संचालक विनय झगडे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन.एस.पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर,  कामगार अधिकारी राम काटकर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे आदी उपस्थित होते.


संभाव्य पूर परिस्थीतीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवा - प्रशासक के.मंजूलक्ष्मी
Total Views: 128