बातम्या

खाशाबा चित्रपट प्रदर्शनावर टांगती तलवार; न्यायालयीन आयोगाच्या मागणीला न्यायालयाची मंजुरी

Khashaba


By nisha patil - 11/5/2026 6:57:55 PM
Share This News:



खाशाबा चित्रपट प्रदर्शनावर टांगती तलवार; न्यायालयीन आयोगाच्या मागणीला न्यायालयाची मंजुरी

खाशाबा जाधव यांच्या कथेबाबत कॉपीराईट वाद तीव्र; 9 जूनला महत्त्वपूर्ण सुनावणी

नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाविरोधात 19 पुरावे सादर; ट्रिझर प्रदर्शनावरूनही प्रश्नचिन्ह

पुणे : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित खाशाबा चित्रपटाच्या प्रदर्शनावर सध्या न्यायालयीन टांगती तलवार निर्माण झाली आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या कॉपीराईट वादात न्यायालयीन आयोग नियुक्त करण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयाने स्वीकारला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 जून रोजी होणार आहे.

मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांनी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव या त्यांच्या पुस्तकावर आधारित कथा परवानगीशिवाय चित्रपटासाठी वापरण्यात आल्याचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणात नागराज मंजुळे, Jio Studios, ज्योती देशपांडे आणि आटपाट प्रोडक्शन यांच्याविरोधात पुणे न्यायालयात दावा प्रलंबित आहे.

दरम्यान, राजा शिवाजी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी महाराष्ट्रात खाशाबा चित्रपटाचा ट्रिझर दाखवण्यात आल्याने वाद अधिकच चिघळला. दावा सुरू असतानाही ट्रिझर प्रदर्शित केल्याचा मुद्दा उपस्थित करत स्थगिती अर्जावर तातडीची सुनावणी घेण्यात आली.

सुनावणीदरम्यान, खाशाबा चित्रपट हा संजय दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचे सांगणारे तब्बल 15 पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. यावेळी नागराज मंजुळे यांचे वकील ॲड. रामकृष्ण कुलकर्णी यांनी जूनपर्यंत चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे तोंडी सांगितले. त्यानंतर दुधाणे यांच्यावतीने ॲड. सुवर्णा शिंदे यांनी न्यायालयीन आयोग नेमण्याची मागणी केली.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आयोगाने चित्रपट पाहून तसेच संजय दुधाणे यांच्या ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पुस्तकाचे परीक्षण करून अहवाल द्यावा, अशी मागणी अर्जातून करण्यात आली आहे. न्यायाधीश अग्रवाल यांनी हा अर्ज स्वीकारला असून, आयोग नियुक्ती व स्थगिती अर्जावर 9 जून रोजी सुनावणी होणार आहे.

जिओ स्टुडिओ आणि ज्योती देशपांडे यांच्यावतीने ॲड. प्रियांका चौधरी यांनी बाजू मांडत स्थगिती अर्ज फेटाळण्याची मागणी केली. मात्र, जिओ स्टुडिओकडून दाखल उत्तराची प्रत वेळेत न मिळाल्याचा मुद्दा वादी पक्षाने उपस्थित केला असून, त्यावर पुढील सुनावणीत निर्णय होणार आहे.

 

कथेबाबत 19 पुरावे न्यायालयात सादर

खाशाबा चित्रपट संजय दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचा दावा करत एकूण 19 पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. यामध्ये चित्रपटाच्या ट्रिझरवरील 5 पुरावे, नागराज मंजुळे यांनी दाखल केलेल्या 5 कोटींच्या अब्रुनुकसान दाव्यातील 4 पुरावे तसेच रणजीत जाधव यांच्यासोबतच्या करारासंदर्भातील 6 पुरावे समाविष्ट आहेत.

विशेष म्हणजे, नागराज मंजुळे यांनी संजय दुधाणे यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसान दाव्यातील शपथपत्रातच कथा दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचे उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. शपथपत्रातील काही पानांवर दुधाणे यांचा कथालेखक म्हणून स्पष्ट उल्लेख असल्याचेही सांगण्यात आले.


खाशाबा चित्रपट प्रदर्शनावर टांगती तलवार; न्यायालयीन आयोगाच्या मागणीला न्यायालयाची मंजुरी
Total Views: 24