बातम्या

ग्रामीण आरोग्य सेवांना बळकटी; खुपीरेत १५ ऑगस्टपूर्वी डायलेसिस सेवा सुरू होणार

Khupire


By nisha patil - 5/13/2026 7:34:34 PM
Share This News:



गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

मुंबई, दि. १३ : करवीर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी खुपीरे ग्रामीण रुग्णालयात १५ ऑगस्टपूर्वी डायलेसिस सेवा सुरू करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे करवीर मतदारसंघातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी या सूचना केल्या.

बैठकीत खुपीरे ग्रामीण रुग्णालयातील सुविधा, आवश्यक मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे तसेच रिक्त पदांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील रुग्णांना स्थानिक पातळीवर वेळेवर उपचार मिळावेत यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञ व दंतविकार तज्ज्ञांची पदे तातडीने भरण्याचे निर्देशही मंत्री आबिटकर यांनी दिले.

यावेळी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचाही आढावा घेण्यात आला. रुग्णालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव तातडीने सादर करून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा विस्तार करून शासकीय रुग्णालयांमधून अधिकाधिक रुग्णांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.

करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी खुपीरे येथे सुसज्ज डायलेसिस युनिट उभारणीसाठी आवश्यक निधी व वैद्यकीय उपकरणांची मागणी करणारे निवेदन सादर केले. तसेच गगनबावडा ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक पायाभूत सुविधांबाबतही त्यांनी मागणी केली.

बैठकीस आरोग्य सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


ग्रामीण आरोग्य सेवांना बळकटी; खुपीरेत १५ ऑगस्टपूर्वी डायलेसिस सेवा सुरू होणार
Total Views: 21