बातम्या

जयसिंगपूर येथील कागद व्यापाऱ्याचे अपहरण;

Kidnapping of a paper merchant from Jaysingpur


By nisha patil - 12/22/2025 11:52:10 AM
Share This News:



कराड :-  जयसिंगपूर येथील एका कागद व्यापाऱ्याचे चौघांनी अपहरण करून चाकू व लाकडी दांडक्याचा धाक दाखवत तब्बल १५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत आरोपींनी व्यापाऱ्याकडील १० लाख ३६ हजार ७०० रुपये रोख तसेच २ लाख रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली. ही घटना कराड तालुक्यातील पाचवड फाट्याजवळ कराड–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली.

या प्रकरणी निकेत श्रीभगवान बियाणी (वय ४३, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निकेत बियाणी हे पेपर व पेपर प्रॉडक्ट्सचा व्यवसाय करतात. गुरुवारी (दि. १८) ते चालक नवनाथ चोरमुले यांच्यासह (वाहन क्रमांक एमएच १२ यूएम २२००) साताऱ्याहून रक्कम घेऊन जयसिंगपूरकडे निघाले होते. कराड येथील व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन सायंकाळी सुमारे ६ वाजता पाचवड फाट्यानजीक थांबून ते पुढे रवाना झाले.

सायंकाळी ६:४० वाजण्याच्या सुमारास एका कारने त्यांच्या वाहनाला मागून धडक दिली. वाहनात मोठी रक्कम असल्याने न थांबता पुढे जात असतानाच, धडक दिलेल्या कारमधून उतरलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी बियाणी यांच्या वाहनात जबरदस्तीने प्रवेश केला.

चाकू-दांडक्याचा धाक, खंडणीची मागणी

आरोपींनी चालू गाडीत चाकू व लाकडी दांडक्याने धमकावत बियाणी व चालकाला मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्यांनी बियाणी यांना त्यांचे मित्र श्रेणिक घोडावत व भाऊ नितीन बियाणी यांना फोन करून अनुक्रमे ५ कोटी व १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यास भाग पाडले.

डिकीतील बॅग लुटली

यानंतर आरोपींनी वाहनाच्या डिकीतील काळ्या रंगाची बॅग उघडून त्यामधील १० लाख ३५ हजार ७०० रुपये रोख काढून घेतले तसेच बियाणी यांच्या गळ्यातील २ तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून घेतली. पुढे काही अंतरावर नेऊन आरोपींनी बियाणी व चालकाला निर्जनस्थळी सोडून दिले.

गुन्हा दाखल, सीसीटीव्ही तपास सुरू

घटनेनंतर दुसऱ्या दिवशी फिर्यादी व चालक कराड येथे आले. त्यानंतर कराड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. फिर्यादीच्या माहितीनुसार, आरोपींपैकी शुभम व हरी अशी दोन नावे संभाषणात ऐकू आली असून उर्वरित दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही.

या प्रकरणी अपहरण, दरोडा, खंडणी व मारहाण या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींचा शोध सुरू आहे.

 


जयसिंगपूर येथील कागद व्यापाऱ्याचे अपहरण;
Total Views: 51