बातम्या
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाला सुरुवात;
By nisha patil - 10/11/2025 4:45:25 PM
Share This News:
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाला सुरुवात;
पहिल्याच दिवशी देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचले सूर्यकिरण
कोल्हापूर, दि. ९ : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रविवारी दक्षिणायन किरणोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी मावळतीची किरणे देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचली. ती लुप्त होताना कानाकडे सरकली.
यंदा ढगांचा अडथळा नसल्याने पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी मंदिरद्वारातून सूर्यकिरणांनी प्रवेश केला. किरणांनी पाच वाजून ४२ मिनिटांनी देवीचे चरणस्पर्श करून हळूहळू पाच वाजून ४३ मिनिटांपर्यंत गुडघ्यापर्यंत पोहोचली. पाच वाजून ४७ मिनिटांनी देवीच्या डाव्या कानापर्यंत पोहोचून हळूहळू लुप्त झाली. त्यानंतर मंदिरामध्ये देवीची आरती होऊन हा सोहळा पूर्ण झाला.
या वेळी देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आणि अभ्यासक प्रा. मिलिंद कारंजकर उपस्थित होते.
विकास आराखड्यात सात दिवसांच्या किरणोत्सवातील अडथळे दूर करण्याचा प्रस्ताव देवस्थान समितीकडून तयार करण्यात आला आहे. किरणोत्सवाच्या पूर्वी दोन दिवस चाचणी घेतली जाते. या दिवशी किरणे गाभाऱ्यापर्यंत पोहोचतात. मात्र त्यातील अडथळे दूर केल्यास तो पूर्ण क्षमतेने होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे सात दिवसांच्या किरणोत्सवातील अडथळ्यांचे सर्वेक्षण करून त्यांचा विकास आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. आराखडा राबविताना हे अडथळे काढून टाकले जाणार असल्याची माहिती सचिव नाईकवाडे यांनी दिली.
किरणांचा प्रवास असा होता — महाद्वार कमान पाच वाजून १० मिनिटांनी, गरुड मंडप मार्ग पाच वाजून १४ मिनिटांनी, मंदिराच्या मागे पाच वाजून २३ मिनिटांनी, कासव चौक पाच वाजून २८ मिनिटांनी, पितळी उंबरा पाच वाजून ३२ मिनिटांनी, चांदीचा उंबरा पाच वाजून ३५ मिनिटांनी, कटांजन पाच वाजून ४१ मिनिटांनी, चरणस्पर्श पाच वाजून ४२ मिनिटांनी, गुडघ्यापर्यंत व कंबरेपर्यंत पाच वाजून ४३ मिनिटांनी, खांद्यापर्यंत पाच वाजून ४५ मिनिटांनी आणि कानापर्यंत पाच वाजून ४७ मिनिटांनी किरणे पोहोचली.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात किरणोत्सवाला सुरुवात;
|