बातम्या
समाजातील अपप्रवृत्ती दूर करण्यासाठी कीर्तन, प्रवचनाची काळाची गरज : प्रा. शिवाजी भुकेले
By nisha patil - 4/25/2026 2:24:51 PM
Share This News:
समाजातील अपप्रवृत्ती दूर करण्यासाठी कीर्तन, प्रवचनाची काळाची गरज : प्रा. शिवाजी भुकेले
आज समाजात मुखवट्यांचे प्राबल्य वाढले आहे. साधू, संत, बुवा, स्वयंघोषित जगद्गुरु यांचे नको तेवढे तण वाढू लागले आहे. या तणाला जो मनापासून उखडून टाकण्याचे खरे काम वारकरी करू शकतो. काम, क्रोध, लोभ ,मोह,मत्सर आदि विकारावर विजय मिळविते ते खरे किर्तन होय. वारकरी हा वैश्विक पातळीवरचा मातृभाव निर्माण करतो. पाखंड खंडनाचे काम फक्त वारकरीच करू शकतो. तेव्हा समाजातील अपप्रवृत्ती दूर करण्यासाठी किर्तन आणि प्रवचनाची खरी आवश्यकता आहे ती काळाची गरज बनली आहे.असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.शिवाजी भुकेले यांनी शेळप (ता.आजरा) येथे वारकरी कीर्तन संमेलनात केले.
शेळप येथे सारथी चारिटेबल ट्रस्ट गडहिंग्लज व समस्त आजरा तालुका वारकरी सांप्रदाय आयोजित पाचवे वारकरी कीर्तन संमेलन उत्साहात संपन्न झाले. या संमेलनात प्रवचनकार प्रा. भुकेले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. सुनील शिंत्रे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त वारकरी कीर्तन संमेलनात गडहिंग्लज,आजरा, चंदगड तालुक्यातील वारकऱ्यांनी सहभाग घेतला. या निमित्य हरिपाठ, वारकरी सन्मान सोहळा यासह हभप ज्ञानेश्वर बंडगर महाराज यांचे कीर्तन झाले.
वारकरी कीर्तन संमेलनात भुकेले म्हणाले की,आज माणसांने भौतिक साधनाच्या मागे लागून आपले स्वास्थ्य बिघडविले आहे. त्यासाठी हरिपाठ आणि किर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून आत्मिक समाधान मिळविले पाहिजे. समाज प्रबोधनाचा वसा आणि वारसा चालवणारे सारथी चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुनील शिंत्रे आणि अंजना रेडेकर यांनी समाजाच्या उन्नतीसाठी चालविलेले सर्व उपक्रम स्तुत्य आहेत.
समाजात सत्वशीलता निर्माण करण्यात साधू -संतांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अध्यात्मिकतेचा वारसा महाराष्ट्राने जपला आहे. ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ, नामदेव महाराज आणि जनाईचे विचार आज देखील उपयुक्त ठरले आहेत. वारकरी सांप्रदायातून भौतिक विकासापेक्षा आत्मिक समाधान मिळते त्यासाठी कीर्तन प्रवचनाची गरज आहे. गडहिंग्लज उपविभागात वारकरी कीर्तन संमेलनाच्या माध्यमातून सारथी चॅरिटेबल ट्रस्ट राबविलेले सर्वच उपक्रम समाजाला दिशादर्शक आहेत. असेही प्रा. भुकेले यांनी स्पष्ट केले.
वारकरी कीर्तन संमेलनाचे ध्वज पूजन, ग्रंथ पूजन, आणि गाथा पूजन, व्यासपीठ पूजन अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.आजरा तालुक्यातील रामकृष्ण हरी वारकरी सांप्रदायिक संस्था यांच्या वतीने हरिपाठ सादर करण्यात आले. यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता. प्रास्तविक आजरा तालुका शिवसेनाप्रमुख युवराज पवार यांनी केले. सारथीचे अध्यक्ष आणि जिल्हा शिवसेनाप्रमुख कोल्हापूर प्रा. सुनील शिंत्रे यांनी स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. ते म्हणाले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध सामाजिक शैक्षणिक कला, क्रीडा, अध्यात्मिक यासह पर्यावरण, जलसंधारण संदर्भात विविध कार्यक्रम वर्षभरात आयोजित केले आहेत. त्यात गडहिंग्लज उपविभागातील जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अंजनाताई रेडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. संमेलनास शिवसेना जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील, महिला जिल्हा संघटिका विमल पाटील, अविनाश शिंदे, सरपंच अर्जुन बागडी,गौरव सुतार .सोमगोंडा देसाई, पार्थ शिंत्रे, पृथ्वी शिंत्रे, मुख्याध्यापक संजय बापट, कृष्णा डाकरे, बचाराम गुरव , शिवाजी आढाव,दिनेश कांबळे यांच्यासह शेळप ग्रामस्थ , आजरा तालुका वारकरी सांप्रदायाचे मान्यवर उपस्थित होते. आभार प्रा. डॉ. सुनील देसाई यांनी मानले. सूत्रसंचलन दिनकर खवरे यांनी केले.
समाजातील अपप्रवृत्ती दूर करण्यासाठी कीर्तन, प्रवचनाची काळाची गरज : प्रा. शिवाजी भुकेले
|