बातम्या
राधानगरीत किसन चौगले समविचारी आघाडीत; आ. सतेज पाटलांकडून उमेदवारी जाहीर
By nisha patil - 8/10/2026 3:04:28 PM
Share This News:
राधानगरीत किसन चौगले समविचारी आघाडीत; आ. सतेज पाटलांकडून उमेदवारी जाहीर
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत राधानगरीतून महायुतीला मोठा राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. गोकुळचे माजी संचालक किसन चौगले यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज समविचारी आघाडीत जाहीर प्रवेश केला. याचवेळी आमदार सतेज पाटील यांनी किसन चौगले यांची समविचारी आघाडीकडून अधिकृत उमेदवारीही जाहीर केली.
कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले गेले नाही, तसेच आपला स्वाभिमान जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे किसन चौगले आणि उमेश भोईटे यांनी स्पष्ट केले. आम्ही १४ वर्षे पक्षाचे नेतृत्व केले, मात्र आमचा स्वाभिमान कधीही गहाण ठेवला नाही, अशी भूमिका किसन चौगले यांनी मांडली. गोकुळचा टर्नओव्हर साडेचार हजार कोटींपर्यंत नेण्यात आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी आमदार सतेज पाटील यांचे मोठे योगदान असल्याचेही चौगले म्हणाले. गोकुळ वाचवण्यासाठी आणि साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठीच समविचारी आघाडीत प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आमदार सतेज पाटील यांनी या सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे स्वागत करत, कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगितले. गोकुळची निवडणूक ही कोणत्याही एका पक्षाची नसून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई असल्याचे त्यांनी म्हटले. या घडामोडीमुळे गोकुळच्या निवडणुकीत राधानगरी तालुक्यातील राजकीय समीकरणांना मोठे वळण मिळाले आहे.
राधानगरीत किसन चौगले समविचारी आघाडीत; आ. सतेज पाटलांकडून उमेदवारी जाहीर
|