बातम्या
कोल्हापूर — राजारामपुरी पोलिसांनी फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस शिताफीने अटक
By nisha patil - 11/20/2025 3:30:59 PM
Share This News:
कोल्हापूर — राजारामपुरी पोलिसांनी फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस शिताफीने अटक
राजारामपुरी पोलीस ठाणे अभिलेखावर फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी सतिश बाबुराव खोडवे (वय 43, रा. सांची रेसिडेन्सी, राजेंद्रनगर, कोल्हापूर — मूळ रा. जयसिंगराव पार्क, कागल) याला अटक केली आहे. फिर्यादी कुमार वरद अभयकुमार पाटील, रा. फुलेवाडी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी खोडवे याच्या मालकीचे 4 हजार स्क्वेअरफुटचे शेड फाईव्ह स्टार MIDC, कागल येथे असून ते भाड्याने देण्यासाठी त्याने स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती.
ही जाहिरात पाहून फिर्यादी यांनी आरोपीशी संपर्क साधून शेड भाड्याने घेण्याचा करार केला आणि आरोपीस 22 नोव्हेंबर 2024 रोजी 50 हजार, 26 नोव्हेंबर 2024 रोजी 1 लाख 50 हजार आणि 12 डिसेंबर 2025 रोजी 1 लाख रुपये चेकने अशी एकूण 3 लाख 40 हजार रुपयांची रक्कम दिली. तसेच जागेवरील सुविधा न दिल्यामुळे फिर्यादींनी स्वतः 40 हजार रुपये खर्चही केले. मात्र आरोपीने कराराचा भंग करत आवश्यक सुविधा उपलब्ध न करून दिल्याने व जागा न देता फिर्यादीची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे यांच्याकडे होता. तपासादरम्यान तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या ठिकाणी छापा टाकला. पोलिस पथकाची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता; मात्र PSI रुपेश इंगळे आणि त्यांच्या पथकाने शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेत अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक धिरजकुमार बच्चु आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पो.उ.नि. रुपेश इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल राम कोळी आणि राजाराम चौगुले यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सुरू आहे.
कोल्हापूर — राजारामपुरी पोलिसांनी फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीस शिताफीने अटक
|