बातम्या

कोल्हापूरच्या विकासासाठी चार महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा प्रस्ताव

Kolhapur 4


By nisha patil - 6/20/2026 10:33:35 PM
Share This News:



कोल्हापूरच्या विकासासाठी चार महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा प्रस्ताव

केंद्रीय आणि राज्य नेतृत्वासमोर मांडणार मागण्या

कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चार महत्त्वाच्या प्रकल्पांचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यानिमित्त सादर करण्यात येणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत या मागण्या निवेदनाद्वारे शासनाकडे मांडल्या जाणार आहेत.

या प्रस्तावांमध्ये सर्वप्रथम अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. मंदिराभोवतीच्या दाट वस्तीतील अरुंद रस्ते ३ ते ६ मीटरवरून ९ ते १२ मीटरपर्यंत रुंद करण्याचा प्रस्ताव असून, यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन भाविकांना दिलासा मिळणार आहे.

दुसरा प्रस्ताव म्हणजे शाहू क्लॉथ मार्केट आणि कोवडी बाजाराचा पुनर्विकास. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या गाळ्यांचे पुनरुज्जीवन करून बहुमजली इमारत, आधुनिक पार्किंग आणि व्यापारी संकुल उभारण्याची योजना आहे.

तिसऱ्या प्रस्तावात बिंदू चौक येथील मध्यवर्ती कारागृहाचे स्थलांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या या जागेचा भविष्यात पार्किंग व अन्य नागरी सुविधांसाठी वापर करण्याचा विचार आहे.

तसेच तुळशी बाग परिसरात भाविक सुविधा केंद्र उभारण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे. येथे बहुमजली पार्किंग, भक्तनिवास आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

हे सर्व प्रकल्प राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून, शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास कोल्हापूरच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


कोल्हापूरच्या विकासासाठी चार महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा प्रस्ताव
Total Views: 24