बातम्या
थकबाकी शून्य मोहिमेत कोल्हापूर परिमंडल आघाडीवर; ११ उपविभागांचा सन्मान
By nisha patil - 5/5/2026 11:54:07 AM
Share This News:
थकबाकी शून्य मोहिमेत कोल्हापूर परिमंडल आघाडीवर; ११ उपविभागांचा सन्मान
आजरा(हसन तकीलदार) : महावितरणची सर्व वर्गवारीतील थकबाकी शून्य करण्याची आव्हानात्मक कामगिरी पार पडणाऱ्या कोल्हापूर परिमंडलातील अकरा उपविभागीय अधिकाऱ्यांना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. राज्यात संपूर्ण थकबाकी शून्य करणारे एकूण अकरा उपविभाग असून हे सर्व अकरा उपविभाग कोल्हापूर परिमंडलातील आहेत.
यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ तर सांगली जिल्ह्यातील दोन उपविभागांचा समावेश होतो.कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित आढावा बैठकित हे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना लोकेश चंद्र म्हणाले, 'कोल्हापूर परिमंडलाचे ग्राहक सेवा, देखभाल दुरुस्ती, थकबाकी वसुली, स्मार्ट मीटर अशा सर्वच निकषांत आघाडीवर राहिलेले आहे. येथून पुढेही असेच चांगले काम करा. कोल्हापूरचा ग्राहक हा प्रामाणिक असून त्यांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण सेवा द्या.पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करा. सुरक्षा साधने वापरून काम करा. अपघात शून्य होण्याकरता प्रयत्न करा.
ग्राहकांना निर्धारित वेळेत सर्व सेवा द्या. एका कार्यालयातील चांगल्या कामाचे अनुकरण करावे.असे आवाहन यावेळी त्यांनी केले. शून्य थकबाकी करणारे अधिकारी व उपविभाग दयानंद अष्टेकर (आजरा),नागेश बसरीकट्टी (नेसरी),शीतल वनारसे (शिरोळ),शरद परीट (गगनबावडा),गिरीश भोसले (कदमवाडी),दयानंद कमदगी (कळे),सारिका शेळके (कोडोली),रणजित पाटील (पन्हाळा),समीर अत्तार (परिते),संजय बालटे (सावळज), अंबादास कटकधोंड (खानापूर).
यावेळी महावितरणचे संचालक (संचलन) सचिन तालेवार, पुणे प्रादेशिक संचालक सुनिल काकडे, कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश कोहाट, अधीक्षक अभियंते गणपत लटपटे, अमित बोकील, पुनम रोकडे, कार्यकारी अभियंते, विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी आदिजण उपस्थित होते.
थकबाकी शून्य मोहिमेत कोल्हापूर परिमंडल आघाडीवर; ११ उपविभागांचा सन्मान
|