विशेष बातम्या

कोल्हापूर सर्किट बेंच इमारतची कामे वेळेत आणि गतीने पुर्ण होतील – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Kolhapur Circuit Bench building work


By nisha patil - 8/8/2025 6:12:37 PM
Share This News:



कोल्हापूर सर्किट बेंच इमारतची कामे वेळेत आणि गतीने पुर्ण होतील – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पुढिल तीन दिवसात इमारतीचे हस्तांतरण, पालकमंत्र्यांकडून कामकाजाची पाहणी

कोल्हापूर, दि. 08 : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला 18 ऑगस्टपासून सुरुवात होत असून, इमारतीची सुरू असलेली कामे वेळेत आणि गतीने पूर्ण होत असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. त्यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासमोरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीमधील प्रस्तावित सर्किट बेंच इमारतीच्या सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, शाखा अभियंता रोहण येडगे, कंत्राटदार अनिकेत जाधव व उदय घोरपडे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे ॲड. इंद्रजित चव्हाण, टी. एस. पाडेकर, व्ही. आर. पाटील, के. व्ही. पाटील, मनोज पाटील, संग्राम देसाई, प्रमोद पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री आबिटकर यांनी यावेळी तिन्ही इमारतींच्या कामांना प्रत्यक्ष भेट देऊन उभारण्यात येणाऱ्या तीन कोर्ट रूम्सची पाहणी केली. यावेळी त्यांनी बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. येत्या 18 ऑगस्टपासून कामांना सुरुवात होणार असल्याने इमारतींचा ताबा न्यायालयाकडे 11 ऑगस्टला देणे आवश्यक असून, याबाबत पुढील तीन दिवसांत इमारत न्यायालयीन कामकाजासाठी हस्तांतरण करण्याचे नियोजन असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.

शाहू महाराजांच्या काळातील व्यवस्थांना सर्किट बेंचच्या माध्यमातून पुन्हा पुनर्जन्म
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील व्यवस्था या सर्किट बेंचच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू होत आहे. कोल्हापूरच्या इतिहासामध्ये अशा अनेक व्यवस्था लोकांना स्थानिक पातळीवर देण्यात आल्या होत्या. सर्किट बेंच कोल्हापूरात सुरू झाल्याने आपल्यासाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. येत्या 18 ऑगस्टला हा बेंच प्रत्यक्षात सुरू होताना कोल्हापूरसह शेजारील पाच जिल्ह्यांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जाईल.


कोल्हापूर सर्किट बेंच इमारतची कामे वेळेत आणि गतीने पुर्ण होतील – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
Total Views: 59