राजकीय
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या, कोल्हापूर. सायलेज तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसायाला चालना
By nisha patil - 5/22/2026 3:43:47 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या, कोल्हापूर. सायलेज तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसायाला चालना
गोकुळ मध्ये नेदरलँडच्या तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन; उत्पादन वाढ व खर्चावर बचतीवर भर
कोल्हापूर, ता.२२ : दुग्ध व्यवसाय आणि पशुधन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘गोकुळ’ दूध संघाने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नेदरलँड्स मधील पी.यु.एम. (प्रोजेक्ट आउट सेंडर मॅनेजर्स) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने सायलेज (मुरघास) या विषयावर विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. नेदरलँड्सचे प्रगतशील शेतकरी हेंड्रिक्स व्हॅन व्हिस्क यांच्या मार्गदर्शनाखाली हे दहा दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
गोकुळ दूध संघ व पी.यु.एम. यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन टप्प्याटप्प्याने दिले जात असून, याआदि पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. एर्विन द. विथ यांनी जनावरांची दूध उत्पादकता वाढविणे व गोठा व्यवस्थापन याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले होते. या पार्श्वभूमीवर नेदरलँड्सचे प्रगतशील शेतकरी हेंड्रिक्स व्हॅन व्हिस्क हे दुसरे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आले होते. त्यांनी विशेषतः सायलेज (मुरघास) या विषयावर सखोल व व्यवसायिक मार्गदर्शन केले. व्हिस्क यांचा स्वतःचा ५०० गायींचा अत्याधुनिक गोठा असून, ते दररोज सुमारे १० हजार लिटर दूध संकलन करतात. ते पूर्णपणे सेंद्रिय शेतीचा अवलंब करत असून पशुधनासाठीचा चारा देखील सेंद्रिय पद्धतीनेच तयार करतात.
सायलेज निर्मितीची आधुनिक पद्धत, योग्य साठवण तंत्र, तसेच पशुधनासाठी पौष्टिक व गुणवत्तापूर्ण चारा उपलब्ध करून देण्याच्या विविध बाबींवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. गुणवत्तापूर्ण सायलेजमुळे दुधाचे उत्पादन व गुणवत्ता वाढते, पशुपालकांचा खर्च कमी होऊन नफा वाढतो, असे त्यांनी स्पष्ट केले. सायलेज तयार करताना कच्चा माल व योग्य वैरणीची निवड, आर्द्रता नियंत्रण, योग्य साठवण आणि वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. दौऱ्यादरम्यान त्यांनी गोकुळ दूध संघाशी संलग्न शिंदेवाडी येथील वैरण बँक, विविध दूध संस्था तसेच मुक्त गोठ्यांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान गोकुळमार्फत सध्या राबविण्यात येत असलेल्या सायलेज प्रकल्पाची माहिती तसेच दूध उत्पादक पातळीवरील अडचणी मांडण्यात आल्या. त्यावर तज्ज्ञांनी उपाययोजना सुचविल्या. प्रत्यक्ष सायलेज निर्मिती स्थळ पाहणी, गोठा भेटी, प्रात्यक्षिके, सादरीकरणे (प्रेझेंटेशन) व गटचर्चा यांच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकारी, सुपरवायझर व दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी हेंड्रिक्स व्हॅन व्हिस्क यांनी ‘गोकुळ’ दूध संघाच्या शेतकरी-केंद्रित कामकाजाचे विशेष कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, सायलेज प्रकल्पांची अंमलबजावणी व शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविलेले उपक्रम हे अनुकरणीय असल्याचे सांगत, ‘गोकुळ’सारख्या सहकारी संस्थांमुळे दुग्धव्यवसाय अधिक सक्षम होत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विकास कक्ष, ताराबाई पार्क येथे गोकुळचे प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक यांच्या हस्ते हेंड्रिक्स व्हॅन व्हिस्क यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक म्हणाले की, गोकुळ व पी.यु.एम. यांच्यातील करारामुळे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन सातत्याने मिळत असून, याचा दुग्धव्यवसायाच्या प्रगतीसाठी निश्चितच मोठा फायदा होणार आहे.
यावेळी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सुद्रिक, सदस्य प्रदीप मालगावे, सुनिल धायगुडे, सागर बलकवडे, चंद्रकांत परूळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, डॉ. दयावर्धन कामत, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या, कोल्हापूर. सायलेज तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसायाला चालना
|