आरोग्य

🩺 कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे १ व २ नोव्हेंबरला वैद्यकीय परिषद

Kolhapur Medical Association to hold medical conference on 1st and 2nd November


By nisha patil - 10/29/2025 1:11:34 PM
Share This News:



कोल्हापूर:- कोल्हापूर मेडिकल असोसिएशन (IMA शाखा कोल्हापूर) तर्फे १ आणि २ नोव्हेंबर रोजी वैद्यकीय परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेची थीम ‘Facing the Future Together – From Connection to Cure’ अशी असून, दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देश-विदेशातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

शनिवारी (१ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसहा वाजता हॉटेल सयाजी येथे परिषदेचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला विधानपरिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच इस्त्रोचे उपसंचालक डॉ. एस. व्ही. शर्मा आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आय. बी. विजयलक्ष्मी यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर. एम. कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील आणि आमदार अमल महाडिक उपस्थित राहणार आहेत.

परिषदेत हेमॅटॉलॉजिस्ट डॉ. एम. बी. अगरवाल, न्यूरॉलॉजिस्ट डॉ. सतीश खाडिलकर, सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉ. उमेश शहा, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. एन. जे. कर्णे, डायबेटॉलॉजिस्ट डॉ. शैलजा काळे, वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. सुप्रिया पुराणिक, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. बिपीन विभुते आणि बेंगळुरूचे न्यूरोसर्जन डॉ. विकास हंचनाळे मार्गदर्शन करणार आहेत.

असोसिएशनतर्फे ‘डॉ. अतुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्कार’ या वर्षी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवारी (२ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजता होणार आहे.

रविवारी दुपारी ३.३० ते ५.३० या वेळेत ‘डॉक्टर आणि जनतेचा संवाद मंच’ याद्वारे ‘आरोग्य, आहार आणि आध्यात्मिक नाते’ या विषयावर सर्वांसाठी खुले व मोफत चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या सत्रात आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित, योगतज्ज्ञ डॉ. समप्रसाद विनोद आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आय. बी. विजयलक्ष्मी मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमात केरळमधील वादक चमूचे फ्युजन इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आणि कार्यशाळा हे विशेष आकर्षण असणार आहे. पत्रकार बैठकीला डॉ. ए. बी. पाटील, सचिव डॉ. अरुण धुमाळे, परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चिंचणीकर, डॉ. शरद टोपकर, डॉ. संदीप पाटील आणि डॉ. शीतल पाटील उपस्थित होते.


🩺 कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे १ व २ नोव्हेंबरला वैद्यकीय परिषद
Total Views: 138