बातम्या
कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
By nisha patil - 10/6/2025 12:10:43 AM
Share This News:
कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर (ता. ९) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांची प्रशंसा करत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज महापालिकेच्या पाच नव्या नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरांचा शुभारंभ केला. हा कार्यक्रम छत्रपती ताराराणी चौक, कावळा नाका येथे पार पडला.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडीक, प्रशासक के. मंजूलक्ष्मी आदी मान्यवर उपस्थित होते.
या नव्या आरोग्य केंद्रांची स्थापना केंद्र सरकारच्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आली असून ती कावळा नाका, टाकाळा निगडे हॉल, राजारामपुरी, सिद्धार्थनगर व साकोली कॉर्नर येथे सुरू झाली आहेत.
पालकमंत्री आबिटकर यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कौतुक करत उरलेली १३ आरोग्य मंदिरे लवकर सुरू करावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, १५ हजार लोकसंख्येसाठी एक आरोग्य केंद्र असावे, ही राज्य शासनाची संकल्पना आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने कॅन्सर व इतर गंभीर आजारांवर वेळीच उपचारासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही नमूद केले.
या आरोग्य केंद्रांमधून प्राथमिक उपचार, असंसर्गजन्य आजारांचे निदान, गरोदर मातांची तपासणी, लसीकरण, तज्ज्ञ सेवा, आणि मोफत योगशिक्षण दिले जाणार आहे. सकाळी ८ ते १ दरम्यान ओपीडी सेवा आणि दुपारी १ ते ४ या वेळेत सर्वेक्षण सेवा कार्यरत राहील.
प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी महापालिकेच्या तीन मुख्य रुग्णालयांसाठी अधिक निधीची मागणी केली. कार्यक्रमाला अधिकारी, डॉक्टर्स, आशा सेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
|