बातम्या
कोल्हापूर जिल्ह्याचा विकास फक्त रस्त्यावरच का थांबलाय? रेल्वेची प्रतीक्षा कायम का? ऍड-चंद्रकांत निकम*
By nisha patil - 4/7/2026 12:50:48 PM
Share This News:
**कोल्हापूर जिल्ह्याचा विकास फक्त रस्त्यावरच का थांबलाय? रेल्वेची प्रतीक्षा कायम का? ऍड-चंद्रकांत निकम*
**आजरा(हसन तकीलदार)*:-सद्या करोडो रुपये केवळ अनावश्यक रस्त्यासाठी खर्च केले जात आहेत. आवश्यक नसणाऱ्या शक्तिपीठसाठी एक लाख करोड देण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत परंतु ज्या रेल्वेमार्गामुळे संपूर्ण कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्हा आणि तेथील गावे जोडली जाणार आहेत, उद्योग धंद्याना चालना मिळणार आहे त्या रेल्वेमार्गासाठी सरकार उदासीन का आहे? असा सवाल कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाचे अध्यक्ष ऍड. चंद्रकांत निकम यांनी उपस्थित केला आहे.
आमच्या प्रतिनिधिशी बोलताना पुढे ते म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज यांचे स्वप्न होते. ज्यांनी शंभर वर्षांपूर्वी रेल्वे मार्ग दाखवला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे. मागील काही वर्षापासून मी ही लोकचळवळ सुरु केली आहे. याचा पाठपुरावा सुरु आहे. शक्तिपीठ महामार्ग चर्चेत येतो, मोठ्या शहरासाठी हजारो कोटींचे नियोजन होते, मंदिरासाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध होतो परंतु कोल्हापूरच्या ग्रामीण भागासाठी रेल्वेचा प्रश्न आला की सर्वे, बैठका, अहवाल आणि केवळ प्रतीक्षा, पुन्हा पुढच्या पिढीकडे ढकललेलं स्वप्न. सामान्य जनतेच्या मनात आज एक कठोर प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या जिल्ह्याच्या विकासाला दीर्घकालीन आणि शाश्वत दळणवळण व्यवस्थेपेक्षा आपत्कालीन दृश्यमान कामाना प्राधान्य का दिलं जातं? वारंवार रस्ते दुरुस्त होतात, नवीन रस्ते, नवीन कामे, नवीन ठेकेदार, राजकीय घोषणा होतात परंतु रेल्वे म्हटले की उदासीनता. जर रेल्वे आली तर एकदाच मोठी जोडणी तयार होते. पिढ्यानपिढ्या उपयोग होतो आणि अगदी स्वस्तात प्रवास होतो, उद्योग येतात. असं असताना मग कोणत्याही लोकप्रतिनिधिनी अथवा सरकारी अधिकाऱ्यांनी याचा विचार का केलेला नाही? आज हजारो युवक आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि ग्रामीण भागातून मुबंई, पुणा, गोव्याकडे विविध कामधंदे, नोकऱ्यासाठी जातात कारण गावातून उद्योगधंदे नाहीत. जर रेल्वे आली तर उद्योगधंद्यांचे जाळे पसरेल, सर्वसामान्यांना परवडणारा स्वस्तात प्रवास होईल, रस्त्यापेक्षा निसर्गाची हानी कमी होईल. जर मोठ्या शहरात बुलेट ट्रेन शक्य असेल, शक्तिपीठ सारखा महामार्ग शक्य असेल तर कोल्हापूर, संकेश्वर, उत्तूर, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, सावंतवाडी, मुंबई, पुणा यांना जोडणारी रेल्वे का शक्य नाही? शाहू महाराजांचा वारसा जपायचा असेल तर शिक्षण, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या उन्नतीशी जोडला गेला पाहिजे. हजारो कोटी केवळ मंदिरासाठी न देता शासनाने भव्य प्रकल्पासोबत शिक्षण, शेती, खेळ आणि मूलभूत सुविधावर तितक्याच ताकतीने खर्च केले पाहिजे. विकास प्रत्येक गावात आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचला पाहिजे. करदात्यांचा पैसा योग्य ठिकाणी खर्च करणे ही सरकारची जबादारी आणि कर्तव्य बनते. यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवळपास 15 ते 20 लाख लोकांना या रेल्वेचा फायदा होऊन देशाच्या दरडोई उत्पन्नामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे तसेच पंतप्रधानांनी पेट्रोल डिझेल वरील आयात शुल्क व गंगाजळी वाचवण्यासाठी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर करा असे सांगून देखील जर केंद्र सरकार व राज्य सरकार रेल्वे कडे दुर्लक्ष करीत असेल त्याला जबाबदार कोण?आजपर्यंत जवळ जेवळ सर्व पक्षांची राज्यात,केंद्रात व जिल्ह्यात सत्ता येऊन देखील रेल्वे बाबत मात्र शाहू महाराजांचं नाव घेऊन वारंवार त्यांची फसवणूक करणे व जनतेला फक्त आश्वासन देणे हेच सुरू आहे. सावंतवाडी,चंदगड,बेळगाव रेल्वे मुळे महाराष्ट्र गोवा व कर्नाटक येथील राज्य एकमेकाला जोडली जाऊन मोठ्या प्रमाणात व्यापार,उद्योगधंद्यात तसेच पर्यटनात वाढ होऊन लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे हे वारंवार लक्षात आणून देखील प्रशासन व अधिकाऱ्यांना का लक्षात येत नाही असा सवाल देखील कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट चंद्रकांत निकम यांनी उपस्थित केला.कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे खंडपीठ आले त्याच जिल्ह्याच्या संपूर्ण तालुक्यात रेल्वे अजूनही आली नाही अशी खंत देखील अनेक वकिलानी बोलून दाखवली आहे असे त्यांनी सांगितले.आज शक्तीपीठ पेक्षाही जिल्ह्यात रेल्वे मार्ग कसा आणता येईल यासाठी लोकप्रतिनिधिनी प्रयत्न करावे.कोल्हापूरचा माणूस विकासाला विरोध करीत नाही. म्हणूनच ग्रामीण भागाना जोडणारी रेल्वे सुरु करण्यासाठी लोकचळवळ सुरु केली आहे. याला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लोकांचा पाठिंबा आवश्यक आहे. या लोकचळवळीला पाठबळ देणे गरजेचे आहे. असे ऍड. चंद्रकांत निकम यांनी संगितले.
कोल्हापूर जिल्ह्याचा विकास फक्त रस्त्यावरच का थांबलाय? रेल्वेची प्रतीक्षा कायम का? ऍड-चंद्रकांत निकम*
|