बातम्या
कोल्हापूर शाही दसरा महोत्सवास राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा; पर्यटन व सांस्कृतिक क्षेत्राला चालना
By nisha patil - 12/9/2025 4:52:10 PM
Share This News:
कोल्हापूर शाही दसरा महोत्सवास राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा; पर्यटन व सांस्कृतिक क्षेत्राला चालना
कोल्हापूर : सन 2023 साली कोल्हापूर शाही दसरा महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याबाबत घोषणा झाली होती. कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने अधिकृतरित्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या परिपत्रकानुसार गुरुवारी शाही दसरा महोत्सवाला राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिला.
कोल्हापूर शहर हे राजर्षी शाहू महाराजांची जन्मभूमी असून, शाही दसरा महोत्सव त्यांच्या काळापासून साजरा केला जात आहे. या महोत्सवांत स्थानिक लोककला, लोकनृत्ये, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि युद्धकलेचे सादरीकरण यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या पुढाकारामुळे या महोत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड, जोतिबा मंदिर, दाजीपूर अभयारण्य, कणेरी मठ, आंबा घाट, खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर यांसारखी पर्यटनस्थळे महोत्सवाच्या आकर्षणात भर घालतील. राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे पर्यटकांना कोल्हापूरमध्ये पर्यटनाचा अनुभव घेता येईल आणि स्थानिक रोजगार व विकासात वाढ होण्यास मदत होईल.
२०२५-२६ या वित्तीय वर्षात पर्यटन विभागाच्या दिनदर्शिकेत कोल्हापूर शाही दसरा महोत्सव मुख्य पर्यटन महोत्सव यादीत समाविष्ट झाला आहे.
कोल्हापूर शाही दसरा महोत्सवास राज्य प्रमुख महोत्सवाचा दर्जा; पर्यटन व सांस्कृतिक क्षेत्राला चालना
|