राजकीय
कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक
By Administrator - 1/15/2026 11:12:25 AM
Share This News:
कोल्हापूर, दि.१४ : कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, जिल्ह्यात तातडीने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विभाग प्रमुखांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्यावर भर देत, पहिल्या २४, ४८ आणि ७२ तासांतील कार्यवाहीचे अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर प्रत्येकी तीन स्थिर तपासणी पथके तात्काळ सक्रिय करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. नागरिकांच्या अडचणींसाठी स्वतंत्र आचारसंहिता कक्ष व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. उमेदवारांच्या सोयीसाठी ‘एक खिडकी’ पद्धत अंमलात आणून, सर्व प्रकारचे विविध परवाने एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच राजकीय प्रचारासाठी जाहिरात पूर्व प्रमाणन व पेड न्यूजसाठी जिल्हास्तरावर जिल्हा माहिती कार्यालयात माध्यम कक्षाची स्थापना करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आचारसंहितेच्या काळात मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या कोणत्याही नवीन शासकीय घोषणा करण्यास मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणचे जाहिरातींचे फलक झाकणे आणि प्रचार साहित्याबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, नागरी भागात आचारसंहिता लागू नसली तरी, तेथेही नवीन घोषणा करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय प्रचारात सहभागी होऊ नये, असेही प्रशासनाने बजावले आहे.
निवडणूक कामकाजाच्या नियोजनाबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, मतदान केंद्रांवरील किमान आवश्यक सुविधांची पाहणी करून दोन दिवसांत अहवाल सादर करावा. यासोबतच नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया शिस्तबद्ध राबविणे, मतदान यंत्रांची (EVM) प्राथमिक चाचणी करणे आणि यंत्रांच्या वाहतुकीबाबत संबंधित राजकीय पक्षांना पूर्वकल्पना देऊन अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. या बैठकीला उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक
|