बातम्या
महावितरणच्या आंतरपरिमंडल नाट्यस्पर्धेत कोल्हापूर परिमंडल विजेते
By nisha patil - 5/10/2026 11:14:29 PM
Share This News:
महावितरणच्या आंतरपरिमंडल नाट्यस्पर्धेत कोल्हापूर परिमंडल विजेते
‘समोरच्या घरात’ नाटकास प्रेक्षकांची दाद
कोल्हापूर, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : महावितरणच्या पुणे प्रादेशिक आंतरपरिमंडल नाट्य स्पर्धेत कोल्हापूर परिमंडलाने विजेतेपद पटकावले, तर रत्नागिरी परिमंडलाने उपविजेतेपद मिळविले. स्पर्धेत कोल्हापूर परिमंडलाने रत्नाकर मतकरी लिखित ‘समोरच्या घरात’ हे नाटक सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. विजेत्या संघास बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, कोल्हापूरचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे ३० सप्टेंबर व ०१ ऑक्टोबर रोजी ही नाट्यस्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी व बारामती परिमंडलांच्या संघांनी सहभाग घेतला. विविध विषयांवरील नाट्यप्रयोगांनी उपस्थित रसिकांची दाद मिळवली. स्पर्धेत पुणे परिमंडलाने विद्यासागर अध्यापक लिखित ‘बॅलेन्स शीट’, रत्नागिरी परिमंडलाने धनंजय सरदेशपांडे लिखित ‘एक्सपायरी डेट’, तर बारामती परिमंडलाने मधुकर तोरडमल लिखित ‘मगारीमिठी’ हे नाटक सादर केले.
कोल्हापूर परिमंडलास नाट्य निर्मितीचा प्रथम क्रमांक फिरत्या चषकासह मिळाला. यासह दिग्दर्शन (प्रथम) अमित बोकील, अभिनय-स्त्री (द्वितीय) श्वेता सांगलीकर, प्रकाश योजना (द्वितीय) रत्नाकर मोहिते, संगीत (द्वितीय) दीपक भोसले व उत्तेजनार्थ अभिनय पौर्णिमा पुरोहित यांना वैयक्तिक पुरस्कार प्राप्त झाले. कोल्हापूर संघ व्यवस्थापक म्हणून वरिष्ठ व्यवस्थापक(मानव संसाधन) अप्पासाहेब पाटील व सह समन्वयक म्हणून उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांनी काम पाहिले. या स्पर्धेत सुषमा शितोळे(कोल्हापूर), प्रकाश खोत(बारामती) व अमय धोपटकर(रत्नागिरी) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
कोल्हापूर परिमंडलाच्या ‘समोरच्या घरात’ या नाटकाने कथानकाची प्रभावी मांडणी, कलाकारांचा जीवंत अभिनय, सुसंगत नेपथ्य व वेशभूषा, प्रभावी प्रकाशयोजना व संगीत यामुळे आपले वर्चस्व सिद्ध केले. या उत्कंठावर्धक व खिळवून ठेवणार्या नाटकास प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. स्पर्धेच्या माध्यमातून महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच नाट्यकलेच्या माध्यमातून सामाजिक व समकालीन विषयांची प्रभावी मांडणी करण्यात आली.
महावितरणच्या आंतरपरिमंडल नाट्यस्पर्धेत कोल्हापूर परिमंडल विजेते
|