बातम्या
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सरपंच परिषदेतर्फे स्वागत कार्यक्रम संपन्न
By nisha patil - 4/15/2026 11:02:00 PM
Share This News:
**कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सरपंच परिषदेतर्फे स्वागत कार्यक्रम संपन्न*
**गावगाड्याच्या प्रश्नांवर साधला संवाद 'स्वामित्व' योजनेतील त्रुटी व सांडपाणी प्रश्नाकडे वेधले लक्ष**
आजरा(हसन तकीलदार)*:-जिल्हा परिषद कोल्हापूरच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. जास्मिन यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला. त्यानिमित्त सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) च्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ व स्वागत पत्र देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच, जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा, उपाध्यक्ष व विविध समिती सभापतींचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
प्रशासकीय राजवट संपून जिल्हा परिषदेवर लोकनियुक्त पदाधिकारी विराजमान झाल्याबद्दल सरपंच परिषदेने आनंद व्यक्त केला.यावेळी सौ. शिल्पा शशिकांत खोत (अध्यक्षा, कोल्हापूर जिल्हा परिषद), तानाजी कृष्णात पाटील (उपाध्यक्ष), सौ. सारिका यशवंत नांदेकर (सभापती, बांधकाम व आरोग्य समिती),सौ. शितल प्रवीण यादव (सभापती, शिक्षण व अर्थ समिती),सौ. श्रद्धा अविनाश गायकवाड (सभापती, समाजकल्याण समिती),सौ. विद्या विलास पाटील (सभापती, महिला व बालकल्याण समिती)यांचाही सत्कार करणेत आला.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील म्हणाले की, "गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासक असल्याने ग्रामपंचायत स्तरावरील अनेक तांत्रिक प्रश्न प्रलंबित होते. आता जबाबदार कारभारी मिळाल्याने ग्रामीण विकासाला आणि गावगाड्याला खऱ्या अर्थाने गती मिळेल. 'सक्षम ग्रामपंचायत व सन्मानित सरपंच' हे सरपंच परिषदेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य होईल अशी आशा व्यक्त केली.
या स्वागत समारंभाचे औचित्य साधून सरपंच परिषदेने जिल्ह्यातील महत्त्वाच्या समस्यांकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यामध्ये प्रामुख्याने स्वामित्व योजना: गावठाण क्षेत्राच्या ड्रोन सर्वेक्षणात अनेक त्रुटी राहिल्याने ग्रामपंचायतींना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे, ही योजना दोषमुक्त करण्याची मागणी करण्यात आली.प्रदूषण व पिण्याचे पाणी: औद्योगिक वसाहतींमधील सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जात असल्याने गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.प्रशासकीय रिक्त पदे: प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र 'ग्राम विकास अधिकारी' नसल्याने कामाचा बोजा वाढून सरपंचांना रोषाला सामोरे जावे लागते.
प्रदेश सरचिटणीस राजू पोतनिस यांनी सरपंचांच्या विविध मागण्यांचा ठराव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठवण्याची विनंती केली.
सरपंचांचे नाविन्यपूर्ण उपक्रम
जिल्ह्यातील सरपंच वणवा निर्मूलन, वृक्ष लागवड, शाळांमध्ये सीसीटीव्ही, सेंद्रिय शेती आणि प्लास्टिक निर्मूलन यांसारखे उपक्रम राबवून गावे शाश्वततेकडे नेत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाला सरपंच परिषदेच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या सौ. राणीताई पाटील, राधानगरी तालुकाध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा कार्यकारणी सदस्या जोत्स्ना पाटील (कुडित्रे), अभिजित पाटील (सडोली), समाधान म्हातुगडे (सोनाळी), प्रभाकर पाटील (चंद्रे), बबन शिंदे (डोणवडे), युवराज पाटील कुडित्रे), दयानंद कांबळे ( तुरंबे)यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सरपंच परिषदेतर्फे स्वागत कार्यक्रम संपन्न
|