ताज्या बातम्या
कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका निवडणूक: निकालानंतर विजयी मिरवणुका आणि फटाके फोडण्यावर जिल्हाधिकाऱ्यांची बंदी
By nisha patil - 1/16/2026 11:10:09 AM
Share This News:
कोल्हापूर, दि. १५ : कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (दि. १६ जानेवारी २०२६) होत आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रियेदरम्यान आणि निकालानंतर शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार विजयी मिरवणुका काढण्यास आणि फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार कारवाई
निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये आणि दोन गटांत संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये हे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ नुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
या गोष्टींवर असेल बंदी (१६ जानेवारी २०२६ रोजी):
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार खालील बाबींवर पूर्णतः बंदी असेल:
१. विजयी मिरवणुका: विजयी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही.
२. रॅली काढणे: राजकीय पक्षाचे कार्यकर्ते किंवा कोणत्याही व्यक्तीला शहरातून किंवा गावातून रॅली काढण्यास मनाई आहे.
३. डीजे आणि डॉल्बी: सार्वजनिक ठिकाणी डीजे किंवा मोठ्या आवाजाची डॉल्बी सिस्टिम लावण्यास बंदी असेल.
४. सायलेन्सर काढून गाड्या चालवणे: दुचाकींचे सायलेन्सर काढून आवाज करत गाड्या चालवणाऱ्यांवर कारवाई होईल.
५. गुलाल उधळणे: सार्वजनिक ठिकाणी गुलालाची उधळण करण्यास किंवा वापर करण्यास मनाई आहे.
६. फटाके फोडणे: निकालानंतर किंवा जल्लोषाच्या नावाखाली फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
मतमोजणीच्या दिवशी कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रात शांतता राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाला बंदोबस्ताचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे, संभाव्य सार्वजनिक उपद्रव टाळण्यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. नागरिकांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका निवडणूक: निकालानंतर विजयी मिरवणुका आणि फटाके फोडण्यावर जिल्हाधिकाऱ्यांची बंदी
|