बातम्या

पेट स्कॅनची उपलब्धतता रुग्णांना दिशादर्शक – प्रकाश आबिटकर*

Kolhapur canser centre


By nisha patil - 8/11/2025 10:50:29 PM
Share This News:



*पेट स्कॅनची उपलब्धतता रुग्णांना दिशादर्शक – प्रकाश आबिटकर*

कोल्हापूर कॅन्सर सेंटर-कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकाच्या पेट सीटी स्कॅन मशीनचे उदघाटन

कोल्हापूर, दि.८ – पेट सीटी स्कॅन मशीनची उपलब्धतता कॅन्सर रुग्णांना दिशादर्शक ठरेल, असे मत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज व्यक्त केले. कोल्हापूर कॅन्सर सेंटर-कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका येथे ना.आबिटकर यांच्या हस्ते पेट सीटी स्कॅन मशीनचे उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कॅन्सरविरुद्धच्या लढाईत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे अशी चांगली सुविधा उपलब्ध करीत आहात.

त्याबद्दल डॉ. सूरज पवार, डॉ रेश्मा पवार यांच्यासह त्यांची पूर्ण टीम कौतुकास पात्र आहे. पेट सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून कोल्हापूर कॅन्सर सेंटरने कॅन्सरविरुद्धच्या लढाईत आणखी एक यशस्वी पाऊल टाकले आहे. कोल्हापूर कॅन्सर सेंटर हे आरोग्य मंदिरच आहे, असे गौरवोदगारही ना. आबिटकर यांनी काढले. डॉ. सूरज पवार यांनी कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे उपलब्ध असणाऱ्या सुविधांविषयी अधिक माहिती देऊन ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्राबरोबर उत्तर कर्नाटक, गोवा येथील कॅन्सर रुग्णांसाठी पेट सीटी स्कॅन मशीन वरदान ठरेल. यामुळे त्वरित निदान होऊन रुग्णावर अचूक उपचार करणे सोपे जाईल.  

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र कुलकर्णी म्हणाले, रुग्णांना उपचारासाठी आता पुणे-मुंबई येथे न जाता येथेच जागतिक स्तरावरील सुविधा त्यांना उपलब्ध तर होत आहेच शिवाय नेहमीच रुग्णांसाठी आधुनिक सुविधांचा ध्यास कोल्हापूर कॅन्सर सेंटरने घेतला आहे.  

डॉ. संदीप पाटील यांनी आभार मानले. ते म्हणाले, कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि कॅन्सर रुग्णांचे एक अनोखे नाते तयार झाले आहे. येथे पूर्णपणे बरे झालेले रुग्ण एक प्रकारची ऊर्मी, आशा देऊन जातात. त्याच पाठबळावर येथे नवनवीन उपक्रम राबविण्याबरोबरच विविध सुविधा उपलब्ध करीत आहोत. यानिमित्ताने पूर्ण टीमसाठी ही पाठीवर थाप असून आणखी नव्या उमेदीने रुग्णांची सेवा करण्याचे बळ मिळेल. यावेळी डॉ. रेश्मा पवार, डॉ. शरद टोपकर, डॉ. योगेश अनाप, डॉ. पराग वाटवे, डॉ किरण बागुल, डॉ अश्विनी माने पाटील, डॉ प्रसाद तानवडे, डॉ चैतन्य पाटील, डॉ अविनाश आनंद, डॉ संजय कुलकर्णी, यांच्यासह कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे सर्व डॉक्टर, कर्मचारी, रुग्णांचे नातेवाईक आदी उपस्थित होते.

 

 


पेट स्कॅनची उपलब्धतता रुग्णांना दिशादर्शक – प्रकाश आबिटकर*
Total Views: 44