बातम्या
दिल्ली स्फोटानंतर कोल्हापूर सतर्क:
By nisha patil - 12/11/2025 4:39:53 PM
Share This News:
दिल्ली स्फोटानंतर कोल्हापूर सतर्क:
जिल्ह्यातील धार्मिक व पर्यटनस्थळांवर कडक सुरक्षा बंदोबस्त
दिल्लीतील स्फोटानंतर कोल्हापूर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक आणि पर्यटनस्थळांवर कडक सुरक्षा उपाय तातडीने राबवण्यात आले आहेत. करवीर निवासिनी श्री अंबाबाई, जोतिबा, आदमापूर, नृसिंहवाडी, खिद्रापूर या प्रमुख मंदिरांपासून रंकाळा तलाव, पन्हाळा, राधानगरी अभयारण्य, रांगणा, गगनगड, पारगड, भुदरगड अशा संवेदनशील भागांपर्यंत पोलिसांचा चोख पहारा ठेवण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू आणि अण्णासाहेब जाधव यांनी मंगळवारी जिल्ह्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेटी देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. विशेषतः अंबाबाई मंदिर परिसरात चारही सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
अत्याधुनिक शस्त्रधारी जलद प्रतिसाद पथकं (QRT) आणि गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मंदिर परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करण्याचे निर्देश गुप्ता यांनी दिले आहेत.
दरम्यान, ताराराणी चौक, संभाजीनगर, शिवाजीपूल, कसबा बावडा, तावडे हॉटेल, उजळाईवाडी उड्डाणपूल आणि नवीन वाशी नाका या गर्दीच्या ठिकाणी कडक नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी सुरू आहे. महामार्गावरही पोलिसांच्या पथकांकडून काटेकोर नजर ठेवली जात आहे.
गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी नृसिंहवाडी, खिद्रापूर या धार्मिक स्थळांची पाहणी करून स्थानिक पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. जयसिंगपूर, शिरोळ आणि कुरुंदवाड येथेही पोलिस यंत्रणा हायअलर्टवर आहे.
स्फोटानंतर कोल्हापूर पोलिसांनी घेतली मोठी खबरदारी; प्रत्येक प्रमुख ठिकाणी वाढवला सुरक्षा कडेकोट पहारा!
दिल्ली स्फोटानंतर कोल्हापूर सतर्क:
|