बातम्या

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमात कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर

Kolhapur ranks second in the Shri Ganesha Health


By nisha patil - 8/9/2025 3:13:45 PM
Share This News:



‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमात कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर

कोल्हापुरात 1569 आरोग्य शिबिरांतून 77 हजार नागरिकांची मोफत तपासणी

कोल्हापूर, दि. 08 : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात कोल्हापूर जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या अनोख्या उपक्रमाने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात 28 ऑगस्टपासून आतापर्यंत 1569 मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात 77 हजार 118 नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला तर 4 हजार 504 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली. विशेष म्हणजे 10 हजार 352 नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आले आणि 4 हजार 323 जणांनी अवयवदानाची नोंदणी केली आहे. हे अभियान संपूर्ण गणेशोत्सवात राबविण्यात आले असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे तर पुणे पहिल्या क्रमांकावर आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये आणि धर्मादाय रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहभागाने हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गणेश मंडळांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला असून, मंडपांजवळील शिबिरांमध्ये गणेशभक्त आणि स्थानिक नागरिकांची मोफत तपासणी केली जात आहे. या शिबिरांमधून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या आजारांचे लवकर निदान करुन रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करुन दिले जात आहेत.

गणेश मंडळांचा जनजागृतीत मोलाचा वाटा गणेश मंडळांनी बॅनर आणि पत्रकांद्वारे या उपक्रमाची व्यापक जनजागृती केली. परिणामी हजारो नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेतला. ही मोहीम केवळ तपासणीपुरती मर्यादित नसून, नागरिकांमध्ये सातत्यपूर्ण आरोग्य जागरुकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे.

लोकाभिमुख उपक्रमाचा आदर्श मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने राबवलेला हा उपक्रम जनहिताचा उत्तम आदर्श ठरला आहे. गणेशोत्सवासारख्या सांस्कृतिक उत्सवाला आरोग्यसेवेची जोड देणारी ही अभिनव संकल्पना नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी मैलाचा दगड ठरत आहे.

संख्यात्मक तपशील-
    •    1,569 आरोग्य शिबिरांचे    
    यशस्वी आयोजन
    •    77,118 नागरिकांची मोफत 
     आरोग्य तपासणी
    •    4,504 रक्तदात्यांचा सहभाग
    •    10,352 आयुष्यमान भारत 
    कार्ड वितरित
    •    4,323 अवयवदान नोंदणी

 


‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमात कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर
Total Views: 45