बातम्या
कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून कर्नाटकला पाणी बहाल
By nisha patil - 6/17/2026 8:53:54 PM
Share This News:
कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून कर्नाटकला पाणी बहाल
राजापूर बंधाऱ्याच्या पाहणीनंतर शेतकरी नेते राजू शेट्टींचा राज्य सरकारवर घणाघाती हल्ला!
कोल्हापूर / शिरोळ: "कोल्हापूर जिल्ह्यातील धरणात पाणीसाठा असताना आणि इथला स्थानिक शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला असताना, राज्य सरकार आपला पाण्याचा हक्क शेजारील कर्नाटक राज्याला बहाल करत आहे.
स्वतःच्या राज्यातील शेतकऱ्यांची पिके जळत असताना परराज्याला पाणी सोडून पोसणारे हे सरकार अत्यंत 'नेबळट' आणि लाचार आहे," अशी घणाघाती आणि संतप्त प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुख्य नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अचानक लागलेल्या उपसाबंदीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीवरील ऐतिहासिक राजापूर बंधाऱ्याला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची गंभीर पाहणी केली.
राजू शेट्टी यांनी राजापूर बंधाऱ्याची पाहणी केल्यानंतर प्रशासनाचा ढिसाळपणा चव्हाट्यावर आणला. "एकिकडे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नद्यांवर जलसंपदा विभागाने कडक उपसाबंदी लागू केली आहे. शेतकऱ्यांनी महागडी खते टाकली आहेत, लावणी केली आहे आणि पाणी नसल्याने भाजीपाला डोळ्यादेखत वाळत आहे. असे असताना, राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात आहे. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी अशा पद्धतीने पळवले जात असताना आपले जलसंपदा विभाग आणि सरकार झोपले आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
शेट्टी पुढे म्हणाले की, "प्रशासनाने केवळ ४ तासांसाठी उपसाबंदी शिथिल केली आणि पुन्हा रात्रीत निर्णय बदलून बंदी कायम ठेवली. हा निव्वळ पोरखेळ सुरू आहे. अधिकाऱ्यांना वातानुकूलित केबिनमध्ये बसून शेतकऱ्यांच्या वेदना समजत नाहीत. खते टाकून पाणी न मिळाल्यास पिके कायमची जळून जातील. शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्यास पूर्णपणे राज्य सरकारचे चुकीचे नियोजन जबाबदार आहे. पाणी उपसा बंदी करण्याआधी जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना किमान एक आठवडाभर सतर्क करणे गरजेचे होते. पुर्वसुचना देवून बंदी घातल्यास पिकांचे नियोजन करणे शक्य आहे. अचानक एका दिवसात बंदी घालून पाणी बंद केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून कर्नाटकला पाणी बहाल
|