राजकीय
कोल्हापुरातील मतदार यादी गोंधळात; हजारो नावे प्रभागाबाहेर, तक्रारींचा पूर
By nisha patil - 11/25/2025 12:34:20 PM
Share This News:
कोल्हापूर : महापालिका निवडणूक २०२५ साठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर होताच मोठा गोंधळ उफाळला आहे. एका प्रभागातील शेकडो नव्हे तर हजारो मतदारांची नावे थेट इतर प्रभागांत आढळल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. काही भागांत तर संपूर्ण सोसायट्यांचीच नावे चुकीच्या प्रभागात टाकल्याच्या घटना समोर आल्या.
रविवारी एकाच दिवशी अनेक हरकती दाखल झाल्या असून, अद्यापही तक्रारींचा ओघ थांबलेला नाही. दुबार नावे, मृत मतदारांच्या नोंदी, अपूर्ण पत्ते आणि वेबसाईटवरील अ-वाचनीय यादी यामुळे ही प्रक्रिया किती निष्काळजीपणे झाली हे स्पष्ट झाले आहे.
सीमेलगतच्या प्रभागांत मोठ्या प्रमाणात झालेली नावांची अदलाबदल, विधानसभा यादीत नाव असूनही प्रभाग यादीत गायब असलेले मतदार आणि अनियमित शिफ्टिंगमुळे संपूर्ण यादीची विश्वसनीयता प्रश्नचिन्हाखाली आली आहे.
२७ नोव्हेंबरपर्यंतची अल्प मुदत पाहता या सर्व चुकांची शहानिशा वेळेत होणार का, यावर गंभीर शंका व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी स्पष्ट, शोधण्यायोग्य आणि सुधारित यादी तातडीने जारी करण्याची मागणी केली आहे.
कोल्हापुरातील मतदार यादी गोंधळात; हजारो नावे प्रभागाबाहेर, तक्रारींचा पूर
|