विशेष बातम्या

भारत–न्यूझीलंड मुक्त व्यापार करार अंतिम; कोल्हापुरी चप्पल थेट न्यूझीलंडच्या बाजारात

Kolhapuri slippers directly into New Zealand market


By nisha patil - 12/23/2025 11:24:23 AM
Share This News:



नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बहुप्रतिक्षित द्विपक्षीय मुक्त व्यापार करार (FTA) अखेर अंतिम झाला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लॅक्सन यांच्यात झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर या कराराची अधिकृत घोषणा करण्यात आली. न्यूझीलंड सरकारनेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे.

या करारामुळे जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल आता इटलीपाठोपाठ थेट न्यूझीलंडच्या बाजारपेठेत पोहोचणार आहे. यामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्रातील पारंपरिक कारागिरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी संधी मिळणार आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, पुढील १५ वर्षांत न्यूझीलंडकडून भारतात सुमारे २० अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक अपेक्षित आहे. या कराराचा महाराष्ट्राला विशेष लाभ होणार असून कोल्हापुरी चप्पल, हस्तकला व हस्तनिर्मित वस्तूंपासून ते कृषी, ऑटोमोबाईल, सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रांपर्यंत सर्वच क्षेत्रांना याचा फायदा होईल. न्यूझीलंडमध्ये भारतीय उत्पादनांची निर्यात अधिक सुलभ होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कराराअंतर्गत शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रातही नवे मार्ग खुले होणार आहेत. पदव्युत्तर शिक्षणासाठी तीन वर्षांचा आणि पीएचडीधारकांसाठी चार वर्षांचा व्हिसा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०२५ मधील हा भारताचा तिसरा मुक्त व्यापार करार असून यापूर्वी ब्रिटन आणि ओमानसोबत असे करार झाले आहेत.

दरम्यान, कोल्हापुरी चपलांना जागतिक ओळख मिळण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. इटलीतील प्रसिद्ध फॅशन कंपनी ‘प्राडा’ने कोल्हापुरातील कारागिरांच्या सहकार्याने कोल्हापुरी चपलांच्या सुमारे दोन हजार जोडांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘प्राडा’चे शिष्टमंडळ यापूर्वी कोल्हापुरात दाखल झाले होते. प्रति जोडी सुमारे ८०० युरो (अंदाजे ८५ हजार रुपये) दराने या चपलांची विक्री फेब्रुवारी २०२६ पासून जगभरात केली जाणार आहे.

भारत–न्यूझीलंड मुक्त व्यापार करारामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्याबरोबरच पारंपरिक उद्योग, कारागीर आणि तरुणांसाठी आंतरराष्ट्रीय संधींचे नवे दालन खुले होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.


भारत–न्यूझीलंड मुक्त व्यापार करार अंतिम; कोल्हापुरी चप्पल थेट न्यूझीलंडच्या बाजारात
Total Views: 33