बातम्या

कोल्हापूरची सई पुजारी चमकली! २५व्या राष्ट्रीय पॅरा स्वीमिंग स्पर्धेत ५ सुवर्णांसह नवा राष्ट्रीय विक्रम

Kolhapurs Sai Pujari shines


By nisha patil - 11/23/2025 5:04:54 PM
Share This News:



कोल्हापूरची सई पुजारी चमकली! २५व्या राष्ट्रीय पॅरा स्वीमिंग स्पर्धेत ५ सुवर्णांसह नवा राष्ट्रीय विक्रम

२५ व्या पॅरा नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूरातील जलतरणपटू सई मोरेश्वर पुजारी हिने झळाळत्या कामगिरीचे सोने पेरत तब्बल ५ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.

सई ही महाराष्ट्र संघातर्फे दिव्यांगांच्या एस-७ कॅटेगरीतून स्पर्धेत उतरली होती. या गटात देशातील २६ राज्यांतील महिला जलतरणपटूंचा सहभाग होता. पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया (PCI) आणि तेलंगणा पॅरा स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हैदराबादमधील गच्चीबाऊली येथील जीएमसी बालयोगी स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा पार पडली.

सईने ५० मीटर आणि १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात प्रत्येकी सुवर्ण, तसेच ५० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण पदकासह नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. तिने हा टप्पा फक्त ५१ सेकंदांत पूर्ण करत विक्रमाच्या नोंद केली.

याशिवाय ४x१०० मीटर फ्रीस्टाईल आणि ४x१०० मीटर मिडले रिले प्रकारात सहकाऱ्यांसह प्रत्येकी एक सुवर्ण पदक पटकावत एकूण ५ सुवर्ण पदकांचे शिखर गाठले.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सईचा दमदार प्रवास सुरूच आहे. आतापर्यंत तिने चार राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघातून १७ सुवर्ण पदके जिंकली आहेत. तसेच क्रोएशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य पदकासह भारताचा झेंडा उंचावला आहे.

नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथील रहिवासी असलेली सई सध्या कोल्हापूरच्या कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून तिच्या कामगिरीचा जिल्हाभरातून गौरव केला जात आहे.


कोल्हापूरची सई पुजारी चमकली! २५व्या राष्ट्रीय पॅरा स्वीमिंग स्पर्धेत ५ सुवर्णांसह नवा राष्ट्रीय विक्रम
Total Views: 22