बातम्या
कोल्हापूरचा पुढील २० वर्षांचा विकास आराखडा तयार होणार!
By nisha patil - 11/27/2026 3:18:18 PM
Share This News:
कोल्हापूरचा पुढील २० वर्षांचा विकास आराखडा तयार होणार!
कोल्हापूरच्या पुढील २० वर्षांच्या विकासाचे नियोजन; ऐतिहासिक वारसा संवर्धन, रस्ते रुंदीकरण आणि पार्किंग व्यवस्थेला प्राधान्य दिले जाणार आहे. शहराच्या भविष्यातील विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी महापालिकेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि भागधारकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. कोल्हापूर शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून तिसरी सुधारित विकास योजना तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या उपस्थितीत भागधारकांची बैठक पार पडली.
या बैठकीत शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळांचे जतन, रस्ते रुंदीकरण, वाहतूक कोंडीवर उपाययोजना, पार्किंग व्यवस्था आणि पर्यटन सुविधांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा, महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि बांधकामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबतही विविध सूचना मांडण्यात आल्या. कोल्हापूरला उत्तम पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी यात्री निवास, सार्वजनिक सुविधा, सुरक्षितता आणि स्मार्ट सिटीच्या धर्तीवर आवश्यक उपाययोजनांवरही भर देण्यात आला.
या बैठकीला आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, बिल्डर्स, क्रेडाई, चेंबर ऑफ कॉमर्स, सामाजिक संस्था, पर्यावरणवादी, पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधी आणि हेरिटेज कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूरचा पुढील २० वर्षांचा विकास आराखडा तयार होणार!
|