विशेष बातम्या
राजकोटमध्ये कोल्हापुराची धमक – अजित नलवडे कर्णधारपदी निवड
By nisha patil - 10/12/2025 4:02:35 PM
Share This News:
राजकोटमध्ये कोल्हापुराची धमक – अजित नलवडे कर्णधारपदी निवड
राज्य राखीव पोलिस दल, कोल्हापूर येथे हवालदार म्हणून सेवा बजावणारे आणि लाईन बाजार, कसबा बावडा येथील प्रतिभावान हॉकीपटू अजित विष्णू नलवडे यांची महाराष्ट्र पोलीस दल हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
सदर संघ ऑल इंडिया पोलीस दल हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असून स्पर्धा सध्या राजकोट, गुजरात येथे सुरू आहे. देशातील सर्व राज्यांच्या पोलीस दलांसह पॅरा मिलिटरी, BSF, CRPF, ITBP, SSB अशा 30 हून अधिक संघांचा सहभाग असल्याने ही स्पर्धा पोलिस दलातील सर्वोच्च पातळीची मानली जाते.
अजित नलवडे यांनी शालेय जीवनापासून हॉकीचा सुरू केलेला प्रवास महाविद्यालयीन स्तरावरही दमदार कामगिरीने पुढे नेला. डी.वाय. पाटील, महावीर कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठाच्या संघातून त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांची राज्य राखीव पोलीस दलात निवड झाली आणि 2010 पासून ते संघाचे अविभाज्य घटक आहेत.
पूर्वी राज्य राखीव दलाच्या संघाचे कर्णधार राहिलेल्या नलवडे यांच्या खेळाचे मूल्यमापन करून त्यांना महाराष्ट्र पोलीस दलाच्या हॉकी संघाचे कर्णधारपद बहाल करण्यात आले आहे.
त्यांच्या यशामागे कमांडंट डॉ. प्रशांत अमृतकर, क्रीडा प्रमुख एपीआय संतोष कांबळे, प्रशिक्षक तुषार कांबळे, झाकीर किल्लेदार, तसेच वडील — निवृत्त सहाय्यक फौजदार विष्णू नलवडे यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे.
अजित नलवडे यांच्या निवडीने कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाची लाट उमटली असून सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राजकोटमध्ये कोल्हापुराची धमक – अजित नलवडे कर्णधारपदी निवड
|