बातम्या
ई-पिक पाहणीच्या वादातून कोतवालाला बेदम मारहाण; पन्हाळ्यात महसूल सेवकांचे कामबंद आंदोलन
By nisha patil - 9/24/2026 3:33:05 PM
Share This News:
ई-पिक पाहणीच्या वादातून कोतवालाला बेदम मारहाण; पन्हाळ्यात महसूल सेवकांचे कामबंद आंदोलन
प्रतिनिधी शहाबाज मुजावर - ई-पिक पाहणीच्या नोंदीवरून झालेल्या वादातून महसूल सेवक अर्थात कोतवालाला मारहाण केल्याच्या घटनेनंतर पन्हाळा तालुका महसूल सेवक संघटना आक्रमक झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आरोपीला अटक होईपर्यंत कामबंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. पन्हाळा तहसील कार्यालयांतर्गत कोलोली येथे कृष्णात बाबुराव पाटील हे महसूल सेवक म्हणून कार्यरत आहेत. बुधवार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास कोलोली येथील तलाठी कार्यालयात ते आणि ग्राम महसूल अधिकारी विद्या देशमुख शासकीय काम करत होते.
त्यावेळी तेलवे गावचे शेतकरी खातेदार धोंडीराम विष्णू पाटील कार्यालयात आले. माझ्या ७/१२ उताऱ्यावरील ई-पिक पाहणी नोंदीत ओढ्याची नोंद का केली नाही? असा सवाल करत त्यांनी वाद घातल्याचे निवेदनात म्हटले आहे. समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कृष्णात पाटील यांना मारहाण केली आणि त्यांच्या डोक्यावर जोरात प्रहार करून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
या घटनेचा तीव्र निषेध करत आरोपीला अटक करून कायदेशीर कारवाई होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा पन्हाळा तालुका महसूल सेवक संघटनेने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
ई-पिक पाहणीच्या वादातून कोतवालाला बेदम मारहाण; पन्हाळ्यात महसूल सेवकांचे कामबंद आंदोलन
|