बातम्या
कोवाडे येथे घराला आग लागून लाखोचे नुकसान*
By nisha patil - 7/5/2026 8:34:10 PM
Share This News:
**कोवाडे येथे घराला आग लागून लाखोचे नुकसान*
**आजरा(हसन तकीलदार)*:- रविवार दिनांक ०३/०५/२०२६ रोजी दुपारी १.०० च्या सुमारास राहत्या घरात अचानक आग लागल्यामुळे शिवाजी बाबु मनगुतकर राहणार कोवाडे, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर येथील त्यांच्या राहत्या घराला आग लागून सर्व प्रापंजिक साहित्य जळून खाक झाले आहे. घराचे दुरूस्ती चे काम चालू असताना अचानक आग लागली व संसार उपयोगी वस्तू भांडी अन्नधान्य, पैसे, दागिने शेतीची औजारे जळून खाक झाली.त्यामुळे मनगूतकर कुटुंबीय उघड्यावर पडले आहेत. जेमतेम परिस्थिती असलेल्या कुटुंबियांवर अचानक आलेल्या या संकटामुळे ते हतबल झाले आहेत.
उन्हाचा तडाका असल्याने लगेचच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे आग आटोक्यात आणताना मर्यादा आल्या.
कोवाडे येथील त्यांचे राहते घर दुरुस्ती करून डागडुगी करण्याचे काम सुरु होते आणि अचानक आग लागल्यामुळे त्यामध्ये प्रामुख्याने घर दुरूस्ती साठी जमा केलेली रोख रक्कम ७०,०००/-
भांडी व अन्य वस्तू २०,०००/- कपाटे व लाकडी वस्तू ३०,०००/-
अन्नधान्य व दागिने ४०,०००/- कपडे लत्ते २०,०००/- शेतीची अवजारे २०,०००/- व इतर घरउपयोगी साहित्य असे एकूण अंदाजे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे.
लागलेल्या आगीत घराने पूर्णतः पेट घेतल्याने शंभर टक्के नुकसान झालेले आहे. स्थानिक नागरिकांनी अग्निशमक दलाला फोन करून बोलावून घेण्यात आले आणि आग विझवण्यास मदत केली. पण धगधत्या उन्हामुळे आग वाढत गेली आणि आटोक्यात येण्यापूर्वीच घरातील सर्व वस्तू संपूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली आढळून आलेली नाही. घरात गॅसची टाकी होती पण त्यामध्ये गॅस कमी असल्याने त्याचा स्फोट झाला नाही. त्यामुळे मोठे अनर्थ टळले.आग लागण्याचं नेमकं कारण कळू शकले नाही.तरीसुद्धा आज या कुटुंबाला समाजाकडून मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. शासनाकडून तसेच लोकप्रतिनिधिनी यामध्ये लक्ष घालून योग्य ती मदत करण्याची अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे.
कोवाडे येथे घराला आग लागून लाखोचे नुकसान*
|