राजकीय
अखेर कृष्णराज महाडिक यांची निवडणुकीतून माघार
By nisha patil - 12/28/2025 1:34:16 PM
Share This News:
कोल्हापूर :- भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेची आगामी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महायुतीच्या एकत्रित निर्णयाचा आदर राखत आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाडिक म्हणाले, भारतीय जनता पक्ष ही शिस्तबद्ध संघटना असून पक्षपातळीवर जो निर्णय घेतला जातो, तो सर्व कार्यकर्त्यांनी मान्य करणे अपेक्षित असते. महायुतीकडून महापालिका निवडणूक एकत्र लढवली जाणार असून, इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, या व्यापक भूमिकेतून आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार सुरुवातीला निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती; मात्र नंतर पक्षीय स्तरावर झालेल्या निर्णयानुसार हा निर्णय बदलल्याचेही त्यांनी नमूद केले.
महापालिका निवडणुकीसाठी आपल्या नावाचा पक्षपातळीवर विचार होणे ही समाधानाची बाब असल्याचे सांगत, पुढील काळातही समाजकारणात सक्रिय राहणार असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्ते, हितचिंतक आणि कुटुंबीयांचे आभार मानले.
अखेर कृष्णराज महाडिक यांची निवडणुकीतून माघार
|