बातम्या

कोल्हापुरात व्यंकटरावच्या कृष्णा दावणे यांना 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने 'सन्मानित.

Krushana davane


By nisha patil - 11/5/2026 3:20:46 PM
Share This News:



*कोल्हापुरात व्यंकटरावच्या कृष्णा दावणे यांना 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने 'सन्मानित.*

**आजरा(हसन तकीलदार)*: 'गंगाधर न्यूज पेपर' आणि 'महाराष्ट्र रत्न सन्मान २०२६' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'शिक्षण व साहित्य संवाद परिषद २०२६' आणि गौरवमूर्तींचा सत्कार सोहळा कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला. शिक्षण, साहित्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या उपस्थितीने हा सोहळा संस्मरणीय ठरला.

प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन

कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रा. महेशकुमार कोष्टी यांनी भूषवले, तर संमेलनाचे उद्घाटन न्यायमूर्ती अमोल देशपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी स्वागतअध्यक्षा प्राचार्या डॉ. सुचिता भोसले यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे माजी अध्यक्ष भीमराव धुळूबुळू उपस्थित होते.

याप्रसंगी प्राध्यापक गणेश लोळगे यांनी 'जिंकण्यासाठी जन्म आपुला' या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम ग. पाचिंद्रे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, चंद्रकांत मोरे, रामतीर्थ समूहाचे जनार्दन निउंगरे, राजेंद्र कांबळे सर (सांगली), लेखक प्रा. चंद्रकांत पोतदार आणि नगरसेवक परशुराम बामणे(भाऊजी )यांची लाभली. कवी प्रा. रवींद्र पाटील आणि लेखक मुबारक उमरानी यांनीही आपले विचार व्यक्त केले.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे 'महाराष्ट्र रत्न' आणि विशेष गौरवमूर्तींचा सत्कार. यामध्ये आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित व्यंकटराव शिक्षण संकुलातील कलाशिक्षक कृष्णा अंतराम दावणे यांच्या शिक्षकी पेशामध्ये विद्यार्थी घडवण्याबरोबरच त्यांच्या चित्रकला ,अक्षरलेखन ,रांगोळी, लेखन फलक चित्ररेखन , व त्यांच्या सामाजिक सेवेची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दखल घेत हा महाराष्ट्र रत्न पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. यांच्यासह सांगली, सातारा, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध मान्यवरांचाही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.

  सत्काराबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना कलाशिक्षक कृष्णा दावणे यांनी आपल्या बालवयातील जडणघडणीमध्ये आई-वडील या कुटुंबातील सदस्यांबरोबरच समाजातील कला प्रेमी जाणकार व्यक्तींच्या प्रोत्साहन व शाबासकीमुळेच चित्रकला या कलेकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. पुढे याच कलेच्या माध्यमातून आपणही विद्यार्थी घडवावेत या उदात्त हेतूने कलाशिक्षक पदवी घेतली . त्यानंतर आजरा तालुक्याचे ज्येष्ठ नेते व आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी आणि संचालक मंडळ यांनी आपल्या व्यंकटराव शिक्षण संकुल आजरा या गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणाऱ्या व संस्थाकालीन प्रशालेमध्ये कलाशिक्षक म्हणून नेमून घेतले. संस्थेने आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरत गेली 25 वर्ष कलाक्षेत्रातून शाळेच्या नावलौकीकात भर घातली. या कामाची नोंद घेत हा पुरस्कार मिळाल्याचे सांगितले.

या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन निमंत्रक आणि संवाद परिषद अध्यक्ष कमलाकर वर्टेकर यांनी केले होते. स्वागत मंडळामध्ये श्रीमती माणिक नागावे, सौ. ज्योतीताई काशिद, तुकाराम पाटील(कागल) आणि इतर सदस्यांनी मोलाची भूमिका बजावली.

कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि साहित्यिक चळवळीला गती देणारा हा सोहळा असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


कोल्हापुरात व्यंकटरावच्या कृष्णा दावणे यांना 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने 'सन्मानित.
Total Views: 324