बातम्या
आंबाघाटात दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न
By Administrator - 6/7/2026 1:28:19 PM
Share This News:
आंबाघाटात दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न
कोल्हापूर तारा न्यूज प्रतिनिधी अजित बोडके –रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील आंबाघाट परिसरात शुक्रवारी रात्री दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रस्त्याच्या कडेला सुरक्षिततेसाठी बसविण्यात आलेल्या लोखंडी ग्रीलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन व संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
सध्या या महामार्गाचे रुंदीकरण व नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने घाट परिसरात अनेक ठिकाणी माती व दगड सैल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका वाढला असून आंबाघाटात अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
घटनेनंतर रस्त्यावर व लोखंडी ग्रीलवर पडलेले मोठमोठे दगड जेसीबीच्या व स्थानिक नागरिकांच्या मदतीने दगड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. काम सुरू असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावरील वाहतूक एका बाजूने सुरू ठेवण्यात आली.
वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस कर्मचारी व महामार्ग पोलीस व प्रशासनाने योग्य नियोजन करत वाहनचालकांना मार्गदर्शन केले.
दगड हटविण्याचे काम वेगाने सुरू असून रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी घाट परिसरातून प्रवास करताना खबरदारी घ्यावी, वेगावर नियंत्रण ठेवावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळ्यात आंबाघाटातील दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. रस्त्याचे नूतनीकरण सुरू असताना सुरक्षिततेला प्राधान्य देत दरडप्रवण भागात संरक्षक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे. दरम्यान, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला असून प्रशासनाकडून दरड कोसळण्याच्या घटना घडत असून रात्रीचा प्रवास करताना जबाबदारी पणे करावा व अवजड वाहनांना रात्रीचा प्रवास करून देऊ नये परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
आंबाघाटात दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न
|