ताज्या बातम्या
लाटगावच्या स्व. विमलाबाई सरदेसाई ट्रस्टचे सामाजिक आणि विधायक कार्यात अतुलनीय योगदान
By nisha patil - 12/25/2025 3:11:13 PM
Share This News:
आजरा(हसन तकीलदार):- आजरा तालुक्यातील लाटगाव येथील स्व. विमलाबाई सरदेसाई ट्रस्टने सामाजिक आणि विधायक कार्यात एक नवीन आदर्श घालून दिला आहे. या ट्रस्टचे संस्थापक व लाटगावचे सामाजिक कार्यकर्ते रणजित सरदेसाई यांनी सामाजिक भान जपत मुंबई तसेच आसपास शहरात राहणाऱ्या आजरेकरांना मदत व्हावी म्हणून आजरा येथे विशेष मदत कक्ष सुरु केले आहे. यामुळे मुंबईकरांना तसेच इतरत्र राहणाऱ्यांना मदत होणार आहे.
या मदत कक्षाच्या माध्यमातून मुंबईकरासाठी सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 यावेळेत एक हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आला आहे. कोणतेही प्रशासकीय काम असल्यास या हेल्पलाईनवर फोन करून त्या कामाच्या संदर्भातील सविस्तर माहिती व लागणारी मदत सांगितल्यास ट्रस्टच्या मध्यमातून मुंबईकर तसेच पुणे व इतर ठिकाणी राहणाऱ्या सर्व आजरेकरांना मदत करण्यात येणार आहे. यामध्ये तहसील विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती तसेच इतर सर्व शासकीय विभागच्या संदर्भात आवश्यक ती सर्व मदत या ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार असलेबाबत संस्थापक रणजितकुमार सरदेसाई यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. बाहेरगावी काम करणाऱ्यांना आजऱ्यात येऊन सर्व शासकीय कामे करून घेताना मानसिक, आर्थिक तसेच अनेक अडचणी येतात. किरकोळ कामासाठी मुंबई, पुणे येथून फेऱ्या माराव्या लागतात. या मदतीमुळे त्यांना सोयीचे होणार आहे.
या अगोदरही या ट्रस्टमार्फत अनेक विधायक व सामाजिक कार्ये करण्यात आली आहेत. गांधीनगरच्या रस्त्यावरील खड्डे मुजविणे, अन्नसुरक्षा योजना लाभ मिळवून देणे, वयोश्री योजना, कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवासाची व्यवस्था, आरोग्य शिबीरे, बांधकाम कल्याण शिबीरे, दिव्यांग सहाय्य साहित्य वितरण, शैक्षणिक सहाय्य अशा अनेक सामाजिक उपक्रम राबविणेत आली आहेत. रणजितकुमार सरदेसाई आणि त्यांच्या पत्नी सौ. श्वेता सरदेसाई यांनी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. या विविध उपक्रमांच्या माध्यमातून तालुक्यातील सुमारे 6500 पेक्षा जास्त नागरिक संस्थेशी जोडले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
लाटगावच्या स्व. विमलाबाई सरदेसाई ट्रस्टचे सामाजिक आणि विधायक कार्यात अतुलनीय योगदान
|