शैक्षणिक

शहाजी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यान व लघुनाट्य सादरीकरण

Lecture and short play presentation on the occasion of Krantijyoti Savitribai Phule Jayanti at Shahaji College


By nisha patil - 4/1/2026 1:57:43 PM
Share This News:



 कोल्हापूर:  शहाजी महाविद्यालयातील कॉमर्स विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त लघुनाट्य सादरीकरण तसेच “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य व विचार” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कॉमर्स विभागप्रमुख प्रा. संतोष कांबळे यांनी केले. त्यांनी कॉमर्स विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची माहिती देत कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. यानंतर बी.कॉम. भाग तीनचा विद्यार्थी कु. आयुष्य गणमाळे याने आपल्या मनोगतातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट प्रभावीपणे उलगडून सांगितला.

कु. फातिमा सय्यद या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच कु. समीक्षा माने या विद्यार्थिनीने आजच्या काळात विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन आत्मविश्वासाने संकटांना कसे सामोरे जावे, याविषयी आपले विचार व्यक्त केले.
    कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या डॉ. सी. के. पाटील यांनी आपल्या व्याख्यानात सावित्रीबाई फुले यांचे विचार आजच्या काळात किती उपयुक्त आहेत हे स्पष्ट करत, त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन जीवनातील कोणत्याही संकटाला निर्भयपणे सामोरे जाता येते, असे मार्गदर्शन केले. 
   अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्ष व त्यांनी केलेल्या समाजसुधारणांचा आढावा घेतला. या संघर्षातून आजच्या महिलांनी प्रेरणा घेऊन समाजपरिवर्तनासाठी पुढे यावे व समाजाच्या विकासात आपले मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कॉमर्स विभागातील विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित लघुनाटिकेचे प्रभावी सादरीकरण केले. कार्यक्रमास आयक्यूएसी समन्वयक डॉ. राहुल मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे, प्रबंधक श्री. रविंद्र भोसले, अधीक्षक श्री. मनीष भोसले तसेच महाविद्यालयातील विविध विभागांतील प्राध्यापक, कॉमर्स विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. अस्मिता इनामदार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. सायली पाटील यांनी मानले. 
 श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास  प्रोत्साहन मिळाले.


शहाजी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यान व लघुनाट्य सादरीकरण
Total Views: 295