शैक्षणिक
आमचा अभिमान वर शहाजी महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
By nisha patil - 10/10/2025 2:45:36 PM
Share This News:
आमचा अभिमान वर शहाजी महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
मराठीच्या अभिजाततेसाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा :डॉ.हिमांशू स्मार्त अभिजात मराठी भाषा
कोल्हापूर : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तो टिकवून ठेवण्यासाठी आणि ही भाषा चिरकाल टिकण्यासाठी सर्वांचा सक्रीय सहभाग महत्वाचा आहे. सर्वच ज्ञान शाखांमध्ये आणि जीवन व्यवहारांमध्ये तिचा वापर व्हायला पाहिजे असे प्रतिपादन नाटककार आणि समीक्षक प्रा. डॉ.हिमांशू स्मार्त यांनी केले. महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर आणि श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील मराठी विभाग व आईक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त त्यांचे व्याख्यान झाले. अभिजात मराठी भाषा :आमचा अभिमान हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. हिमांशू स्मार्त म्हणाले, काळाच्या ओघात माणसं मृत पावतात.समूह, संस्कृती नष्ट होते. पण भाषा चिरकाल टिकते. त्या भाषेतील संचितच ती भाषा अभिजात ठेवण्यासाठी पूरक ठरते. भाषेच्या अभिजाततेसाठी दोन ते तीन हजार वर्षाचा कालावधी लागतो. केवळ कथा, कादंबऱ्या, कवितेतून अभिजात भाषा राहणार नाही तर ती जीवन व्यवहारांमध्ये आणि ज्ञान व्यवहारांमध्ये तिचा वापर व्हायला पाहिजे. अंतरविद्याशाखीय व्यवस्थेमध्ये विविध बटे तयार झाली आहेत.भाषा ही त्या सर्वांना जोडणारा सेतू झाली पाहिजे. मराठी भाषेमध्ये हे व्यवहार झाले पाहिजेत. तर ती अधिक समृद्ध आणि अभिजात होईल. मराठी भाषेची ग्रहण क्षमता, अभिक्षमता वाढवण्याची गरज आहे.
ते म्हणाले, भाषा संवर्धनामध्ये आणि अभिजात मराठी भाषेसाठी ग्रंथालयाची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे. सर्व विषयातील ग्रंथसंग्रह ग्रंथालयात एकत्रित असतो. शिक्षक, प्राध्यापक, सेवकांनी या ग्रंथसंग्रहाकडे जिज्ञासू वृत्तीने पाहिले पाहिजे. विज्ञान, भूगर्भशास्त्र, पर्यावरण व इतर शास्त्रांमध्ये सुद्धा मराठी भाषेतून लेखन झाले पाहिजे. तर ती भाषा अधिक समृद्ध होते. यासाठी सर्वांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. हृदयातून आणि मेंदूतून भाषा संवर्धनाचे हे काम झाले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली .
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण म्हणाले, भाषा टिकवण्याची आणि भाषा संवर्धनाची जबाबदारी ही सर्वांची आहे. मानवी विकासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून भाषेकडे पाहिले जाते. विद्यार्थी हे ज्ञान जाणून घेण्यासाठी महाविद्यालयात येतात .शिक्षकांनी याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे . यशवंतराव चव्हाण साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे महाविद्यालयात आल्यानंतर विचार कसा करावा हे विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे. त्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शिक्षकांची, प्राध्यापकांची आहे. विद्यार्थ्यांनी कसे वाचावे याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षक आणि ग्रंथालयांची आहे. त्यातूनच भाषा समृद्ध होईल व ती टिकून राहील.
या उपक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले .स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.डी.के.वळवी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.पि.के.पाटील यांनी केले. डॉ.सौ.रचना माने यांनी आभार मानले. डॉ. पल्लवी कोडक यांनी संयोजन केले. सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमचा अभिमान वर शहाजी महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.
|