विशेष बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित व्याख्यान संपन्न
By nisha patil - 6/12/2025 4:41:38 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित व्याख्यान संपन्न
कोल्हापूर दि. 6 : जात ही या देशाचे वास्तव आहे. हीच जातव्यवस्था बदलण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर झगडले. विद्येच्या प्रांगणातील राजे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. आपण सर्व एक आहोत ही भावना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या मनात बिंबवली. शेतकऱ्यांसाठीचा सर्वात मोठा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काढला. ज्या देशाची शेती व उद्योगधंदे विकसीत असतात, त्याच देशाची प्रगती होते. हे ओळखून डॉ.आंबेडकरांनी वित्तआयोग, जलआयोग, ऊर्जा आयोग स्थापन करुन देशाला समृध्द करण्यावर भर दिला. बाबासाहेबांनी अपार संघर्षातून समाजातील कनिष्ठ, वंचित आणि उपेक्षित घटकांना अभिवृद्धीची संधी उपलब्ध केली.
तसेच शिक्षणाला विकासाचे माध्यम मानत नवभारताच्या निर्मितीची दृष्टी निर्माण केली, देश उभारणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांचे विचार आणि कर्तृत्व विद्यार्थ्यांनी अंमलात आणून चौफेर वाचन करावे आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवावा, असे प्रतिपादन भोगावती महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख, प्रसिध्द विचारवंत प्रा.डॉ. विजय काळेबाग यांनी केले. ते विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित आधुनिक भारताच्या निर्मितीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे हे होते.
अध्यक्षीय मनोगत मांडताना मा.कौस्तुभ गावडे यांनी, अनेक महापुरुषांनी देश घडविला आहे. मानवतेचे प्रतिक म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. महापुरुष जातीत विभागले जात नाहीत; ते कर्तृत्वाने देश घडवतात आणि पुढील पिढ्यांना दिशा देतात. समाजातील जातियता नष्ट करण्याचे महत्वपूर्ण कार्य डॉ.आंबेडकरांनी केले. युवा पिढीने जयंती, महापरिनिर्वाण दिन यादिवशी व्यसनाधिनता टाळून या महापुरुषांच्या विचारांचा जागर करावा आणि देशाच्या विकासामध्ये सहभागी व्हावे, असे मत मांडले.
कार्यक्रमाची सुरुवातीस संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थना आणि रोपास पाणी घालून झाली. स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस. पी. थोरात यांनी केले. आभार डॉ.एकनाथ आळवेकर यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुप्रिया पाटील यांनी केले. या कार्यक्रमास ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे स्टाफ सेक्रेटरी, रजिस्ट्रार श्री एस के धनवडे, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते
विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित व्याख्यान संपन्न
|