विशेष बातम्या

बाजारभोगावजवळ बिबट्याचा हल्ला; गव्याचे पिल्लू ठार, परिसरात दहशत

Leopard attack near Bazarbhogaon Cow cub killed panic in the area


By nisha patil - 12/22/2025 11:28:19 AM
Share This News:



पन्हाळा :- बाजारभोगाव–पोहाळवाडी मुख्य रस्त्यालगत असलेल्या पोहाळवाडी गावाजवळील ‘कुंभारकी’ नावाच्या शेतशिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गव्याचे पिल्लू ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जंगलालगतच्या शिवारात बिबट्याचा वावर वाढल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पोहाळे तर्फ बोरगाव येथील शेतकरी उत्तम कृष्णात पाटील हे पोहाळवाडी येथील कुंभारकी शिवारातील आपल्या ऊस पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता उसाच्या पिकात गव्याचे पिल्लू मृत अवस्थेत आढळून आले. त्यांनी तात्काळ याची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता हे पिल्लू मादी जातीचे सुमारे तीन महिन्यांचे असून बिबट्याच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

पन्हाळा परिक्षेत्राचे वनाधिकारी अजित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारभोगावचे वनपाल राजाराम रसाळ, वनरक्षक मच्छिंद्र नवाळी व वनमजुरांनी घटनास्थळी पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी अभिजित खांडेकर, पशुधन सर्वेक्षक शिवराज पाटील व परिचर तुकाराम गुरव यांनी मृत गव्याचे शवविच्छेदन केले.

दरम्यान, या घटनेनंतर वन विभागाकडून संबंधित परिसरात ट्रॅप कॅमेरा बसवण्यात आला असून शनिवारी रात्री त्या कॅमेऱ्यात बिबट्या स्पष्टपणे कैद झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे या भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

वनपाल राजाराम रसाळ यांनी नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देत, “या संपूर्ण परिसरावर वन विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. काही दिवस शेतात कामासाठी किंवा राखणीसाठी जाणे टाळावे. अत्यावश्यक परिस्थितीत शेतात जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी,” असे आवाहन केले आहे.


बाजारभोगावजवळ बिबट्याचा हल्ला; गव्याचे पिल्लू ठार, परिसरात दहशत
Total Views: 37